माता न तू वैरिणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:22 AM2018-04-08T00:22:41+5:302018-04-08T00:23:12+5:30

आईला अटक : घाटनांद्रा येथील बालकाच्या खून प्रकरणाला कलाटणी

 Mother nor do you wary ... | माता न तू वैरिणी...

माता न तू वैरिणी...

googlenewsNext

सिल्लोड : तालुक्यातील घाटनांद्रा येथील १० महिन्यांच्या बालकाच्या खून प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली असून, बाप व काकाने नव्हे तर जन्मदात्या आईकडूनच पोटच्या गोळ्याचा जीव गेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून भांडण झाल्याने रागाच्या भरात १ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घरात सासरची सर्व मंडळी झोपलेली असताना कविता मोरे ही घरातून बाळाला घेऊन निघून गेली. बाळ रडत होते. त्याच्या रडण्याचा आवाज कोणाला येऊ नये, यासाठी तिने त्याला छातीशी घट्ट धरले. त्यात बाळाचे नाक व तोंड दबल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला. स्वत:चा गुन्हा लपविण्यासाठी तिने पती व दिरावर खुनाचा आरोप लावला होता. यामुळे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत बालक सागरचे वडील संदीप मोरे व काका किशोर मोरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खोटी माहिती कविताने पोलिसांना दिली खरी पण, शेवटी खुनाला वाचा फुटली आणि चाणाक्ष पोलिसांनी उलगडा केला. पोलिसांनी कविताला अटक करून सिल्लोड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिची हर्सूल कारागृहात रवानगी केली.
कवितावर पोलिसांना आधीच होता संशय
फिर्यादी अशोक आमटे, कविताने पती व दिराविरुद्ध दिलेली तक्रार, कविताचा जबाब, घटनास्थळाची परिस्थिती, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला शवविच्छेदन अहवाल, यावरून पोलिसांचा कवितावर संशय बळावला होता. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने हा गुन्हा कबूल केला.
चुकले, मला माफ करा
माझ्या पोटच्या मुलाचा नकळत माझ्या हातून खून झाला. आता आपण फसू, यातून वाचायचे असेल तर खुनाचा आरोप दुसºयांवर ढकलू, असे मला सुचले.
कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी सागरचा मृतदेह हा एका ओढ्यातील वाळूमध्ये पुरून टाकला. स्वत:चा गुन्हा लपविण्यासाठी आरोप पती व दिरावर लावले, असे म्हणून तिने टाहो फोडला. मी चुकले, मला माफ करा. त्याचा खून करण्याचा इरादा नव्हता. केवळ रडणे बंद करायचे होते. त्याचे रडणे कायमचे बंद होईल असे वाटले नव्हते; पण चुकीने तो मरण पावला, असे कविताने सांगितले.
१२ तास बसली झाडात लपून
दिवस उजाडल्याने कविताचा शोध घेण्यासाठी तिचे नातेवाईक व गावातील लोक येत असल्याचे पाहून कविता ओढ्याच्या काठावर असलेल्या करंजी व बेलाच्या झाडात सकाळी सहा ते संध्याकाळी अंधार पडेपर्यंत तब्बल बारा तास लपून बसली होती व अंधार पडल्यानंतर त्या ठिकाणावरून तिने पलायन केले.
सातच दिवसांत लावला पोलिसांनी तपास
सात दिवसांत पोलिसांनी घटनेचा तपास करून सत्य समोर आणले. ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक संदीप सावळे, सरिता गाढे, हवालदार विष्णू पल्हाड, विलास सोनवणे, विठ्ठल डोके, दादाराव पवार यांनी केली.
फोटो... आरोपी कविता मोरे.

Web Title:  Mother nor do you wary ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस