घाटी रुग्णालयात बाळाला सोडून माता पसार; जाताना ठेवली दुधाची बाटली अन् कपडे
By संतोष हिरेमठ | Published: January 3, 2024 08:02 PM2024-01-03T20:02:37+5:302024-01-03T20:03:10+5:30
बाळाला पाहून हळहळ : घाटीतील बालरोग विभागात केअर टेकरकडून सांभाळ
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात ८ महिन्यांच्या बाळाला सोडून माता पसार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. बाळाला सोडून जाताना महिलेने दुधाची बाटली आणि बाळाच्या कपड्याची पिशवी सोडली. बाळाला सोडून जाताना काळजीपोटी दुधाची बाटली ठेवल्याचे म्हणत घाटीतील कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.
घाटी रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक २७ जवळ चेहऱ्याला स्कार्फ बांधलेल्या एका मातेने स्वतःकडील ८ महिन्यांचे बाळ जवळच असलेल्या एका महिलेकडे सोपविले. औषधी घेऊन लगेच येते, असे सांगत ती तिथून गेली, परंतु ती परतलीच नाही. या महिलेने वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. रात्री महिला सुरक्षारक्षकांनी बाळाचा सांभाळ केला. त्यानंतर, बाळाला बालरोग विभागाच्या वार्डात दाखल करण्यात आले. याविषयी भारतीय समाजसेवा केंद्राला माहिती देण्यात आली. या केंद्राच्या केअर टेकर माता चिमुकल्याचा सांभाळ करीत आहेत. डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारीही बाळाची काळजी घेत आहेत.
घटना ‘सीसीटीव्ही’मध्ये, पण ओळख पटेना
बाळाला सोडून जाणारी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र, चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला असल्याने ओळख पटण्यासाठी आणि शोध घेणे अवघड असल्याचे सुरक्षारक्षकांनी म्हटले.