'आईच पाठवायची परपुरुषासोबत'; प्रियकरासोबत पळालेल्या अल्पवयीन मुलीने सांगितली आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 04:30 PM2022-12-12T16:30:46+5:302022-12-12T16:33:41+5:30
आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीस अनैतिक संबंध ठेवण्यास पाडले भाग
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड (औरंगाबाद) : आईनेच पोटच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस ७० वर्षीय हॉटेल मालकासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याने वैतागलेल्या मुलीने प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले. इकडे आईने मुलगी हरवल्याची तक्रार दिल्यानंतर अजिंठा पोलिसांनी केलेल्या तपासात फिर्यादी आईच आरोपी निघाली. ही घटना सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे घडली.
रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी (वय १७) व तिची आई (३७) सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथील रहिवासी आहेत. या अल्पवयीन मुलीची आई ही बाळापूर येथील सलीम मलिक (७०) या हॉटेल व्ह्यू पॉईंट या हॉटेल मालकाच्या घरात कपडे धुण्याचे काम करत होती. सोबत मुलीलाही घेऊन जात होती. सलीम मलिक याचा अल्पवयीन मुलीवर डोळा होता. त्याने या महिलेस आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस त्याच्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. दोन वर्षांपासून तो सतत तिच्यावर बलात्कार करत होता; पण हे संबंध त्या मुलीला पसंत नव्हते, म्हणून तिने तिचा प्रियकर राहुल दिलीप निंभोरे (२१, रा. बाळापूर) याला फोन केला व आपण पळून जाऊन लग्न करू, असे सांगितले.
११ नोव्हेंबर रोजी ती सारोळा येथून पुणे येथे पळून गेली. त्यानंतर पाठीमागून राहुल पुण्याला गेला. तेथे त्यांनी एका ठिकाणी लग्न केले. त्यानंतर ते पुणे येथे काही दिवस व नंतर गुजरात येथील राजकोटमध्ये भाड्याने खोली घेऊन पती-पत्नीसारखे राहू लागले. इकडे मुलीच्या आईने आपली मुलगी हरवली आहे, अशी तक्रार अजिंठा पोलीस ठाण्यात २७ नोव्हेंबर रोजी दिली. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध सुरू केला असता, गुजरात राज्यातील राजकोट येथे हे दोघे असल्याची माहिती त्यांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, फौजदार धम्मदीप काकडे यांनी त्यांना शोधून सारोळा येथे आणले. ती अल्पवयीन असल्याने पोलिसांनी राहुल विरुद्ध पोक्सो व बलात्काराचे गुन्हे दाखल केले व अल्पवयीन मुलीस बाल सुधारगृहात पाठविले.
येथे हे प्रकरण संपले, असे पोलिसांना वाटत असताना याप्रकरणी वेगळीच माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी न्यायालय व बाल कल्याण समितीची परवानगी घेऊन ती फाईल पुन्हा उघडली. त्या मुलीचा इनकॅमेरा जवाब नोंदविण्यास सिल्लोड न्यायालयाने परवानगी दिली. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी पोलिसांनी इनकॅमेरा पीडितेचा जबाब घेतला. यावेळी तिने आपबिती सांगितली. त्यावरून पोलिसांनी आई, हॉटेल मालक व प्रियकर यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आई व राहुल निंभोरे यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने आरोपींची शुक्रवारी हर्सुल कारागृहात रवानगी केली. तिसरा आरोपी सलीम मलिक हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बळजबरी करणार होते लग्न
अजिंठा पोलिसांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारले असता, तिने, मला आई-वडिलांकडे पाठवू नका, ते माझे लग्न बळजबरी दुसऱ्यासोबत लावून देणार आहेत. त्यात राहुलचा दोष नाही, तो माझा प्रियकर आहे. सलीम मलिक याने माझ्यावर जबरदस्ती केली. त्याला माझ्या आईने मदत केली व माझ्यावर दबाव आणला. दोषींवर कारवाई करा, अशी मागणी केली अन् हे प्रकरण समोर आले.