विशेष मुलांना घडविणारे मातृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:31 AM2018-05-13T01:31:46+5:302018-05-13T01:33:38+5:30

मातृत्वाचे सुख मिळणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना असते. त्यामुळेच प्रत्येक आईसाठी आपल्या बाळाचा जन्मदिन अविस्मरणीय ठरतो. अपत्याच्या जडण-घडणीमध्ये सगळ्यात मोलाची भूमिका निभावणारीही आईच असते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम मूल जन्मल्यास मिळणारे मातृत्व निश्चितच आनंददायी असते; पण आपल्यापोटी जन्माला आलेले मूल हे विशेष आहे, हे समजल्यावर दु:ख गिळून आपल्या विशेष पाल्याला घडविण्यासाठी जिद्दीने उभी राहिलेली आई निश्चितच असामान्य ठरते.

Motherhood specializing in special children | विशेष मुलांना घडविणारे मातृत्व

विशेष मुलांना घडविणारे मातृत्व

googlenewsNext
ठळक मुद्देजागतिक मातृदिन : त्यांच्या मातृत्वाला, त्यांच्या जिद्दीला सलाम

ऋचिका पालोदकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मातृत्वाचे सुख मिळणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना असते. त्यामुळेच प्रत्येक आईसाठी आपल्या बाळाचा जन्मदिन अविस्मरणीय ठरतो. अपत्याच्या जडण-घडणीमध्ये सगळ्यात मोलाची भूमिका निभावणारीही आईच असते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम मूल जन्मल्यास मिळणारे मातृत्व निश्चितच आनंददायी असते; पण आपल्यापोटी जन्माला आलेले मूल हे विशेष आहे, हे समजल्यावर दु:ख गिळून आपल्या विशेष पाल्याला घडविण्यासाठी जिद्दीने उभी राहिलेली आई निश्चितच असामान्य ठरते. यावेळी खरोखरच तिच्या आईपणाची कसोटी लागते. सामान्य मुलांसारखे घडवता आले नाही, तरी आपल्या मुलाला स्वावलंबी करण्याचा प्रयत्न ही प्रत्येक आई करते आहे. आज जागतिक मातृदिनी विशेष मुलांना घडविणाऱ्या मातांचा गौरव करण्याचा प्रयत्न आणि त्यांच्या मातृत्वाला, त्यांच्या जिद्दीला
सलाम.
ती स्वावलंबी होते आहे
आशू जन्मली तेव्हा दिसायला अगदी गोंडस, गोरीपान होती. दिसायला सुंदर होती; पण कापसासारखी मऊ होती. ती जन्मली तेव्हाच ती सर्वसामान्य मुलांपेक्षा थोडी वेगळी आहे, याची आम्हाला जाणीव झाली. काही दिवसांनी डॉक्टरांनी स्वत:च सांगितले की, आशू ही विशेष मूल असून इतर मुलांच्या तुलनेत हिचे चालणे, बोलणे आणि एकंदरीत सगळ्याच हालचाली हळू असतील. ती इतर मुलांच्या तुलनेत उशिरा गोष्टी शिकेल. हे ऐकून सुरुवातीला खूप वाईट वाटले. हिंमत खचून गेली. पण नंतर या गोष्टीला स्वीकारले आणि ती आहे तशी स्वीकारून तिला घडविण्याचे ठरविले. भरपूर वैद्यकीय उपचार केले; पण प्रत्येक ठिकाणाहून सारखेच उत्तर यायचे. फार काही नाही; पण तिला निदान स्वत:पुरत्या तरी सगळ्या गोष्टी करता याव्यात, यासाठी मग प्रयत्न सुरू केले. आज आशू बावीस वर्षांची आहे. नृत्य करणे तिला विशेष आवडते. नवजीवन विशेष मुलांच्या शाळेकडूनही या कलेसाठी प्रोत्साहन मिळतेय. मला स्वयंपाकात, घरकामात मदत करणे, दुकानात एकटीने जाऊन थोडेफार सामान आणणे या गोष्टी ती न अडखळता करते. हळूहळू ती स्वावलंबी होत आहे, यातच आम्हाला आनंद आहे, असे आशूच्या आई पद्मा वाघ यांनी सांगितले.
चित्रकलेत कौशल्य असणारा मोबीन
मोबीन शेख हा १४ वर्षांचा विशेष मुलगा. त्याला ऐक ण्याची आणि बोलण्याची समस्या आहे; पण असे असले तरी मोबीन चित्रकलेत अत्यंत तरबेज असून विविध स्पर्धांमध्ये त्याने यश मिळविले आहे. याशिवाय इंटरनेटचा शिताफीने वापर करण्याचे कौशल्यही त्याला अवगत आहे, अशी माहिती मोबीनची आई रुबिना यांनी दिली. मोबीनचा जन्म आठव्या महिन्यात झाला. त्यावेळी शहरात बंद सुरू होता. त्याचे वडील त्यावेळी बाहेरगावी होते. जन्मानंतर लगेचच मोबीनला आॅक्सिजनची कमतरता भासू लागली. दुसºया दवाखान्यात तातडीने हलविणे आवश्यक होते; पण काही कारणामुळे त्यात दिरंगाई झाली. यानंतर तो अनेक दिवस काचेच्या पेटीत होता. त्याच्या शारीरिक हालचाली सर्वसामान्य मुलांसारख्या होत्या; पण तो बोलू शकत नव्हता. डॉक्टरांचा सल्ला घेतला, अनेक वैद्यकीय उपचार केले; पण तरीही यश आले नाही. मग रुबिना यांनी त्याला समजून घेऊन त्याच्यातल्या कला विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्याचे काम त्यालाच करायचे शिक वून त्याला स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला. आज मोबीनला प्रत्येक गोष्ट इशाºयावरून समजते; पण ऐकता व बोलता येत नसल्यामुळे तो व्यक्त होऊ शकत नाही, असे रुबिना यांनी सांगितले.
शिवणकामात विद्याला गती
विद्याच्या जन्माच्या आधी मला कावीळ झाला होता. आधी तिला माझ्या कावीळचा संसर्ग आणि नंतर न्यूमोनिया झाला. आॅक्सिजनची कमतरता जाणवली. तिला डॉक्टरांनी तपासले तेव्हाच सांगितले की, तिच्या मेंदूची वाढ इतर मुलांच्या तुलनेत हळू आहे. सुरुवातीला खूप दु:ख झाले. तीन वर्षे झाले तरी ती बोललीच नाही. उठणे, बसणे, चालणे या गोष्टीही तिच्या हळुवारच होत्या; पण यथावकाश ती या सर्व गोष्टी शिकली. लहानपणापासूनच ती फार पटकन चिडते. तिचे मानसिक संतुलन लगेच बिघडते. एकदा तिचा स्वत:वरचा ताबा सुटला की, तिच्यावर नियंत्रण मिळविणे अवघड जाते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तिच्या कलेकलेने घ्यावी
लागते.
आज विद्या २७ वर्षांची झाली आहे; पण तरीही तिच्या मानसिक अवस्थेत काहीही फरक नाही. नवजीवन शाळेमध्ये तिला कापडी पिशव्या, अ‍ॅप्रन अशा गोष्टी शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या गोष्टींमधूनच तिला उपजीविकेचे साधन उपलब्ध होईल, अशी आशा वाटते. घरातही मी तिला प्रत्येक कामात सोबत घेते. स्वयंपाकघरातही तिला विविध गोष्टी आवर्जून करायला लावते. बाहेरच्या जगात उभे राहता यावे म्हणून घराबाहेर जाऊन करण्याची लहान-सहान कामेही तिला सांगते. भविष्यात रोजगार मिळावा म्हणून तिला शिलाई मशीन विकत घेऊन देणार असल्याचेही विद्याच्या आई शोभा देवतवाल यांनी स्पष्ट
केले.

मानसिकता बदलण्याची गरज
आॅटिझम या प्रकारात मोडणारा अभिषेक विविध खेळांमध्ये आणि चित्रकलेमध्ये तरबेज आहे. क्रिकेट, बॅडमिंटन हे खेळ त्याला मनापासून आवडतात आणि हे खेळ खेळताना तो तासन्तास मैदानात रमतो. मला त्याला चांगले प्रशिक्षण देण्याची खूप इच्छा आहे; पण विशेष मुलांना खेळाच्या वर्गाला प्रवेश दिला जात नाही, हे माझे खरे दु:ख आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत अभिषेकच्या आई छाया शिंदे यांनी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
छाया यांनी अभिषेकला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत त्याला त्याची स्वत:ची कामे करण्यासाठी स्वावलंबी बनविले आहे. आपल्या मुलाने विविध खेळांचे शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावे, क्रिकेट किंवा बॅडमिंटनमध्ये प्रावीण्य मिळवावे आणि एक खेळाडू म्हणून समोर यावे, असे छाया शिंदे यांचे स्वप्न आहे; पण समाजाने अशा मुलांचा अजूनही न केलेला स्वीकार, हा या स्वप्नातील मोठा अडसर आहे. यासाठी त्यांनी अनेक प्रशिक्षकांचे दरवाजे वारंवार ठोठावले; पण अशा मुलांना आपल्या क्लासमध्ये प्रवेश देण्यास कुणीही तयार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रशिक्षकांनी नकार दिल्यावर छाया यांनी स्वत: अभिषेकला खेळ शिकविण्यास सुरुवात केली; पण ते शिक्षण अत्यंत जुजबी असून त्याचा खेळ बहरण्यासाठी त्याला प्रशिक्षक मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

नेटकºयांनी आधीच साजरा केला ‘मदर्स डे’
व्हॉटस्अ‍ॅप किंवा सोशल मीडियावर काहीही आले तरी ते न वाचताच जसेच्या तसे ‘फॉरवर्ड’ करण्याची नेटिझन्सला प्रचंड घाई असते. त्यामुळे आलेला संदेश कितपत खरा आहे, याची पडताळणी करून पाहण्याचीही कुणाला गरज वाटत नाही. नेटिझन्सचा हाच उतावळेपणा दि.८ मे रोजी दिसून आला आणि त्या दिवशीचा तथाकथित ‘मदर्स डे’ सगळ्याच अतिउत्साही नेटिझन्सला पार एप्रिल फूल बनवून गेला. आईची महती सांगायला आणि तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त करायला कधीच कोणत्या दिवसाची वाट पाहत बसण्याची गरज नसते; पण तरीही मे महिन्याचा दुसरा रविवार ‘मदर्स डे’ म्हणून जगभर उत्साहात साजरा केला जातो. त्यानुसार यावर्षी दि.१३ रोजी जागतिक मातृदिन आहे.
यंदा मात्र दि.८ मे रोजीच कुणीतरी सोशल मीडियावर टाकलेला मातृदिनाचा संदेश प्रचंड व्हायरल झाला. तसेही हल्ली प्रत्येक सण-वार आणि ‘डे’ नेटवरच साजरे करण्याचे ‘फॅड’ आहे. त्यामुळे या संस्कृतीचे पाईक असणाºया अनेकांनी सकाळीच आलेला हा संदेश पाहून ‘आई’ या विषयावर विविध कविता, लेख, चारोळ्या रचून पाठवायला सुरुवात केली. ‘स्टेटस’ आणि ‘डीपी’ या दोन गोष्टीही धाडधाड बदलल्या गेल्या आणि प्रत्येक ठिकाणी आईसोबतचे फोटो झळकू लागले. सामान्य आणि गमतीची वाटणारी ही घटना अगदीच किरकोळ नाही. यातून सोशल मीडियाचा जनसामान्यांवर असणारा प्रभाव लक्षात येतो. त्यामुळे समाजहितासाठी आपल्याकडे आलेला प्रत्येक संदेश काळजीपूर्वक वाचून त्याची पडताळणी करून मगच पुढे पाठवावा, अशी खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.

Web Title: Motherhood specializing in special children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.