आईची तक्रार आणि मुलीच्या साक्षीने पत्नीचा खून करणाऱ्यास आजन्म कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 01:46 PM2019-02-08T13:46:45+5:302019-02-08T13:47:09+5:30
पाच वर्षांच्या मुलीची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने दिला निकाल
औरंगाबाद : दोरीने गळा आवळून पत्नी रेणुकाचा खून करणारा पैठण तालुक्यातील एकतुनी येथील विलास सर्जेराव घोडके (३५) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी गुरुवारी (दि.७) आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला.
विशेष म्हणजे खुनाच्या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली मृताची आणि आरोपीची पाच वर्षांची मुलगी सत्यवान हिची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा आणि दंड ठोठावला. विलास घोडकेच्या दोन बायका मरण पावल्यानंतर त्याने रेणुकासोबत तिसरे लग्न केले होते. १२ मार्च २०१५ रोजी रेणुका आपल्या पाच वर्षांची मुलगी सत्यवान आणि तीन वर्षांचा मुलगा कुणालला घेऊन सैलानी बाबा दर्ग्यावर गेली होती. तेथे विलासने पत्नीला बेदम मारहाण केल्यामुळे रेणुका मुलांना घेऊन माहेरी (केणवाडीला) निघून गेली होती. नंतर गुढीपाडव्याच्या दिवशी रेणुका आपल्या दोन्ही मुलांना घेऊन परत सासरी नांदण्यास आली होती.
२५ मार्च २०१७ रोजी पत्नी रेणुका, दोन मुले, आरोपीची आई सुभद्राबाई असे घरात झोपले असताना मध्यरात्री विलासने पत्नी रेणुकासोबत भांडण करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान त्याने दोरीने तिचा गळा आवळण्याचा प्रत्यन केल्यामुळे ती जोरात ओरडल्याने मुले आणि सुभ्रदाबाई जागी झाली. सुभद्राबाईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आईच्या हनुवटीचा चावा घेऊन तिला ढकलून दिल्यामुळे ती मदतीची याचना करीत घराबाहेर पळत सरपंचाच्या घरी गेली. त्यावेळी विलासने पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा आवळून घरातून पळून गेला.
सरपंचाचा मुलगा प्रवीण भानुसे आणि सुभद्राबाई घरी आले त्यावेळी रेणुका अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी तिला तपासून मृत घोषित केले. मयताची सासू सुभद्राबाईच्या तक्रारीवरून पाचोड पोलीस ठाण्यात विलासविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक बी. एम. धबडगे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहा. लोकअभियोक्ता मधुकर आहेर यांनी बारा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने विलासला खुनाच्या आरोपाखाली आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. आईचा चावा घेतला म्हणून सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.