भटक्या-विमुक्त चळवळीचे नेते मोतीराज राठोड यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:48 PM2019-08-20T12:48:07+5:302019-08-20T12:52:07+5:30

महाराष्ट्रभरातील भटक्या-विमुक्तांची चळवळ उभी केली.

Motiraj Rathod, leader of the National tribe Movement dies | भटक्या-विमुक्त चळवळीचे नेते मोतीराज राठोड यांचे निधन

भटक्या-विमुक्त चळवळीचे नेते मोतीराज राठोड यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्दे अनेक आंदोलनांनी त्यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला होता.

औरंगाबाद : भटक्या-विमुक्त चळवळीचे नेते, विद्यापीठ नामांतर लढ्यातील अग्रणी व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मोतीराज राठोड यांचे आज दुपारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. 

राठोड यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या बंजारा कॉलनीतील निवासस्थानी चळवळीतील कार्यकर्त्यांची, बंजारा समाजाच्या स्त्री-पुरुषांची मोठी गर्दी झाली. गेल्या काही वर्षांपासून प्रा. राठोड हे कॅन्सरसारख्या आजाराशी मुकाबला करीत होते. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले; परंतु उपचार सुरू करण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. राठोड यांच्या पश्चात पत्नी कला राठोड, दोन मुले, मुलगी, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. 

प्रा.  राठोड यांनी वसंतराव नाईक महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून सेवा केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रभरातील भटक्या-विमुक्तांची चळवळ उभी केली. अनेक आंदोलनांनी त्यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला होता. प्रा. राठोड यांचा जन्म २ सप्टेंबर १९४३ रोजी दिंडाळा तांडा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ येथे झाला. १९६३ मध्ये नगरपालिकेत नाका कारकुनाची नोकरी करतानाच एम.ए. (मराठी), एम.ए. (हिंदी), एम.फिल.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विद्यापीठ नामांतर चळवळीतही त्यांचा सहभाग होता. राज्य व राष्ट्रीय  पातळीवरील साहित्य अकादमीपासून ते विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले.

‘कबीरां’चे गाढे अभ्यासक
 प्रा. मोतीराज राठोड हे संत कबीरांचे, त्यांचे दोहे आणि भजनांचे अत्यंत गाढे अभ्यासक होते. कबीरांवर त्यांनी विपुल लेखन केले आणि कबीरांवर ते तासन्तास बोलू शकत होते. ‘कबीरा खडा बाजार में, लिये लुकाटी हाथ, जो घर फुंके अपना चलो हमारे साथ’ हे ठासून सांगताना प्रा. राठोड कमालीचे खुलत. 

प्रा. राठोड यांची विपुल ग्रंथसंपदा
प्रा. राठोड यांनी विपुल लेखन केले. बंजारा संस्कृती, कबीर-जोतिबा, कहत कबीर, तांडा संस्कृती, भटक्या-विमुक्तांचा जाहीरनामा, समाज और संस्कृती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती, कबीरवाद, गोरमाटी, गोर बंजारा जनजाती का इतिहास, गोर बंजारा जागतो रेस, गोर बंजारा वंशाचा इतिहास, गुन्हेगार जमाती कायदा आणि परिणाम, पाल निवासी भटक्या जमाती, सिंधू संस्कृतीपूर्व गोर संस्कृती नांदत होती, लदेणी, बंजारा संस्कृती और ऋग्वेदकालीन संस्कृती तुलनात्मक अध्ययन, बंजारा लोकसाहित्य का संकलन और विश्लेषण, याडी उद्ध्वस्त तांडा कथा, मी आणि चळवळ, कायीं ठाली कायीं भरी बाते, प्राचीन बंजारा समाज व्यवस्था, नोटिफाईड ट्राईब्ज नोमॅडिक ट्राईब्ज ही पुस्तके त्यांनी लिहिली.

Web Title: Motiraj Rathod, leader of the National tribe Movement dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.