सॉफ्टवेअर इंजिनिअरची प्रेरक भरारी; जन्मजात अंधत्व, नंतर मधुमेह, आता देशभर करतो जागृती

By संतोष हिरेमठ | Published: December 11, 2023 11:42 AM2023-12-11T11:42:37+5:302023-12-11T11:42:50+5:30

रोज ५ वेळा इन्सुलिन : हैदराबादच्या लक्ष्मीनारायणाची दुहेरी संकटावर मात करून आयुष्यात भरारी

Motivational Hiring of Software Engineer Lakshmi Narayan; Congenital blindness, then diabetes, now raising awareness across the country | सॉफ्टवेअर इंजिनिअरची प्रेरक भरारी; जन्मजात अंधत्व, नंतर मधुमेह, आता देशभर करतो जागृती

सॉफ्टवेअर इंजिनिअरची प्रेरक भरारी; जन्मजात अंधत्व, नंतर मधुमेह, आता देशभर करतो जागृती

छत्रपती संभाजीनगर : जन्मत: अंधत्व. अंधत्वावर मात करून आयुष्य पुढे नेत असतानाच इयत्ता दहावीत असताना मधुमेहाचे (टाइप-१) निदान झाले. लहान वयातच अंधत्वाबरोबर ‘टाइप-१ डायबेटिस’चे संकट. दररोज इन्सुलिन घेण्याची वेळ. या सगळ्या परिस्थितीतही हार न मानता आयुष्यात भरारी घेत तो साॅफ्टवेअर इंजिनिअर बनला. एका नामांकित कंपनीत काम करण्यासह डायबेटिस एज्युकेटर म्हणून तो देशभर जनजागृतीसाठी भटकंती करतो. अगदी एकटाच.

हा अवलिया आहे हैदराबाद येथील २८ वर्षीय लक्ष्मीनारायणा वरीमडुगू. शहरात बालमधुमेहावरील राष्ट्रीय परिषदेनिमित्त तो शहरात आला असता त्याच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी त्याने मनमोकळेपणाने त्याचा प्रवास उलगडला. लक्ष्मीनारायणा म्हणाला, आंध्र प्रदेशातील अनंतपूरम येथील शेतकरी कुटुंबात जन्म झाला. जन्मत: अंधत्व होते. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली होती. अंधत्वासोबत जीवन पुढे जात असताना दहावीत अचानक टाइप-१ डायबेटिसचे निदान झाले. रोज ५ वेळा इन्सुलिन घेण्याची वेळ ओढवली. सुरुवातीला ते अवघड वाटले. मात्र, हळूहळू त्याच्यासोबत जगण्याची सवय झाली. साॅफ्टवेअर इंजिनिअरपर्यंत मजल मारली. हैदराबाद येथील एका कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. बालमधुमेही आणि त्यांच्या कुटुंबीयांना या आजाराला कशाप्रकारे सकारात्मकरीत्या सामोरे यावे, यासाठी त्यांना प्रेरणा देण्याचाही प्रयत्न करतो. त्यासाठी आजवर विविध शहरांत गेलो आहे. अगदी बालमधुमेहीच्या घरी जाऊनही संवाद साधतो. माझ्यामुळे जर कोणाला प्रेरणा मिळत असेल तर यापेक्षा मोठा आनंद नाही, असे लक्ष्मीनारायणा म्हणाला.

आजार कोणताही असो, आत्मविश्वास दाखवा
मी पूर्वी मुंबईतही काम केलेले आहे. आता हैदराबादला काम करतोय. मुलाखतीत मी अंध आहे, मला टाइप-१ डायबेटिस आहे, हे सांगण्यापेक्षा माझ्यातील आत्मविश्वास दाखविला. कोणताही आजार तुमच्या यशाच्या आड येऊ शकत नाही, असे लक्ष्मीनारायणा म्हणाला.

४ वेळा हाफ मॅरेथाॅन, आता पूर्ण मॅरेथाॅनची तयारी
लक्ष्मीनारायणा म्हणाला, मी आतापर्यंत ४ वेळा हाफ मॅरेथाॅन धावलो आहे. आता ४२ कि.मी.च्या पूर्ण मॅरेथाॅनचीही तयारी करीत आहे. बालमधुमेहींच्या कुटुंबीयांनाही या आजाराविषयी शिक्षित करण्याची गरज आहे.

Web Title: Motivational Hiring of Software Engineer Lakshmi Narayan; Congenital blindness, then diabetes, now raising awareness across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.