अडचणींचा डोंगर : कारखान्यांच्या चाकांची गती अद्याप मंदावलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 07:58 PM2020-06-10T19:58:15+5:302020-06-10T20:00:21+5:30
पूर्ण ताकदीने उत्पादन सुरू करण्यासाठी आॅर्डर, वाहतूक, कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा आणि कामगारांची कमतरता ही उद्योगांसमोरील मोठी आव्हाने आहेत.
औरंगाबाद : प्रशासनाने घालून दिलेले नियम, अटींचे पालन करून शहर आणि परिसरतील पाच औद्योगिक वसाहतींमधील उद्योग सुरू झाले असले, तरी कच्चा माल, दळणवळण, पुरेशा प्रमाणात आॅर्डर व मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महिनाभरापासून उद्योगांची गती मंदावलेलीच आहे.
लॉकडाऊनमुळे ४० दिवस देशभरातील उद्योगांची चाके थांबली होती. अलीकडे काही नियम व अटींवर शासनाने उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार जवळपास महिनाभरापासून शहर आणि परिसरतील शेंद्रा, वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, पैठण रोड व पैठण या पाच औद्योगिक वसाहतींमधील उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली. या पाचही औद्योगिक वसाहतींमधील सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठे, असे मिळून एकूण ५ हजार उद्योग आहेत. यापैकी सध्या ४ हजार ३०० उद्योग सुरू झाले आहेत. मात्र, पूर्ण ताकदीने उत्पादन सुरू करण्यासाठी आॅर्डर, वाहतूक, कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा आणि कामगारांची कमतरता ही उद्योगांसमोरील मोठी आव्हाने आहेत.
सध्या देशभरातील मार्केट काही प्रमाणात मार्केट सुरू झाले असले, तरी अजून मालाला पाहिजे तसा उठाव नाही. त्यामुळे उत्पादन वाढविण्यावर उद्योगांना मर्यादा आलेल्या आहेत. सध्या अवघ्या ४० टक्के क्षमतेने उत्पादन काढले जात आहे. पुरेशा आॅर्डर नसल्यामुळे उद्योजक चिंतेत आहेत.
कच्चा माल आता उपलब्ध आहे; पण वाहतूक व्यवस्था (ट्रान्स्पोर्टिंग) पूर्ण क्षमतेने नसल्याने उत्पादित माल बाहेर पाठविण्यावर आणि कच्चा माल आणण्यावर मर्यादा आहेत. कोरोनाला घाबरून क्लीनर, ड्रायव्हर, माल चढवणारे- उतरवणारे लोक कामावर येण्यास अजूनही तयार नाहीत.
सध्या ८० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. उत्पादित मालाला पाहिजे तसा उठाव नाही. ट्रान्स्पोर्टिंगची समस्या अजून सुटलेली नाही. देशभरातील विविध मोठ्या शहरांमध्ये कच्चा माल उपलब्ध आहे; पण पुणे आणि मुंबईमध्येच ट्रेडर असून, ही दोन्ही शहरे रेड झोनमध्ये असल्यामुळे पाहिजे तशी ट्रान्स्पोर्टिंग सुरू झालेली नाही. जर आगामी काळात कोरोनामुळे परिस्थिती बिघडली नाही, तर पूर्ण ताकदीने उद्योग सुरू होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. -मुकुंद कुलकर्णी, मराठवाडा अध्यक्ष, सीआयआय