कन्नड पोलीस कॉलनीवर शोककळा; भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 06:49 PM2024-09-08T18:49:17+5:302024-09-08T18:49:36+5:30

कन्नड-चाळीसगाव रोडवर दूचाकी आणि बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला.

Mourning at Kannada Police Colony; Two children of police personnel died in a horrific accident | कन्नड पोलीस कॉलनीवर शोककळा; भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांचा मृत्यू

कन्नड पोलीस कॉलनीवर शोककळा; भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांचा मृत्यू

कन्नड : येथील कन्नड-चाळीसगाव रोडवर (जुनी मधूर डेरी येथे) भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. दुपारी १:२० वाजता घडलेल्या या घटनेत दोन तरुण जागीच ठार झाले. ओम श्रावण तायडे(वय १७) आणि आदित्य शेखर राहिंज(वय १६) अशी मृतांची नावे असून, दोघे कन्नड येथील पोलीस कॉलनीतील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वडनेरहून कन्नडकडे येणारी बस (एम एच २० बी एल ०८८३) व कन्नडकडून अंधानेर फाट्याकडे जाणाऱ्या तरुणांची दुचाकी (एम एच २० एफ क्यू ९१९९)  ची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. यात ओम आणि आदित्य गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांनाही कन्नड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. पण, तोपर्यंत खुप उशीर झला होता. वैद्यकीय अधिकारी सुरेंद्र कुलकर्णी यांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.

आदित्य हा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.हे. कॉं. शेखर राहिंज यांचा तर ओम हा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार श्रावण तायडे यांचा मुलगा होता. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात भेट देऊन विभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर, शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. बाळासाहेब भापकर , ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो. नि.  डॉ. रामचंद्र पवार यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचे सांत्वन केले.

आदित्य राहिंज याच्या पश्चात आई-वडील, एक बहीण असा, तर ओम तायडे याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सा. फौ. जयंत सोनवणे, पो. काँ. दिनेश खेडकर करत आहे.

 

Web Title: Mourning at Kannada Police Colony; Two children of police personnel died in a horrific accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.