व्हॅक्सिन कोर्ट’ स्थापन करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:12 PM2018-12-01T23:12:26+5:302018-12-01T23:13:14+5:30
लसीकरणानंतर काही कारणांनी बालकांना बाधा झाल्यास संबंधित दोषी आणि कंपनीवर गुन्हे दाखल करून कारवाई होण्याच्या दृष्टीने ‘व्हॅक्सिन कोर्ट’ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
औरंगाबाद : लसीकरणानंतर काही कारणांनी बालकांना बाधा झाल्यास संबंधित दोषी आणि कंपनीवर गुन्हे दाखल करून कारवाई होण्याच्या दृष्टीने ‘व्हॅक्सिन कोर्ट’ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. विभागीय आयुक्तांनी एका पत्राद्वारे आरोग्य उपसंचालकांना यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
औरंगाबादेत गांधेली येथे लसीकरणानंतर आठ महिन्यांची बालिका दगावली. औरंगाबादसह राज्यात अन्य ठिकाणी लसीकरणानंतर बालकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या. गांधेली येथील बालिकेच्या मृत्यूसंदर्भात आणि त्यापुढील घटना ‘लोकमत’ने वेळावेळी वृत्तांमधून समोर आणल्या. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण तालुका सचिव डॉ. विलास जगदाळे, औरंगाबाद शहर सहसचिव दीपक पवार, सचिव संतोष कुटे यांनी ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताच्या कात्रणासह विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले.
देशात लसीकरणामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी विशेष तरतूद नाही. त्यामुळे पीडितांना न्याय मिळत नाही. त्यामुळे व्हॅक्सिन कोर्ट स्थापन करण्यात यावे. यामुळे लस बनविणाºया कंपन्यांवर कायद्याचा वचक राहील आणि लसीकरणामुळे इजा झाल्यास संबंधित व्यक्ती, कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सोपी होईल, अशी मागणी ‘मनसे’ने केली.
आगामी दिवसांत कार्यवाही
विभागीय आयुक्तांनी औरंगाबाद आरोग्य उपसंचालकांना एका पत्राद्वारे व्हॅक्सिन कोर्ट स्थापन करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचना केली आहे. यामुळे आगामी कालावधीत औरंगाबादेत व्हॅक्सिन कोर्ट स्थापन होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------