लातूरच्या फळ बाजारात ‘कोकणच्या राजा’ची चलती
By Admin | Published: April 30, 2017 11:46 PM2017-04-30T23:46:35+5:302017-04-30T23:51:31+5:30
लातूर : लातूरच्या फळबाजारात कोकणच्या राजाची चलती असून, रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस आंब्याला ग्राहकांतून मोठी मागणी आहे
लातूर : लातूरच्या फळबाजारात कोकणच्या राजाची चलती असून, रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस आंब्याला ग्राहकांतून मोठी मागणी आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा बाजारात मोठी उलाढाल झाली.
लातूरचा फळबाजार कोकणच्या राजाने बहरला आहे. गंजगोलाई परिसर आणि हनुमान चौक ते गुळ मार्केट या दरम्यान आंब्यांचा बाजार थाटण्यात आला आहे. या फळबाजारात लातूरसह कर्नाटक, कोकण आणि आंध्र प्रदेशातील व्यापारी आंबे घेऊन दाखल झाले आहेत. कोकणच्या हापूस आंब्याची दोन डझनांची पेटी ८०० ते १२०० रुपयांमध्ये ग्राहकांना मिळू लागली आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा डझनाचा भाव परवडत नसल्याने पर्याय म्हणून केशर आंबे खरेदी करण्यासाठी काही ग्राहकांची गर्दी आहे. श्रीमंतांचा आंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड आणि रत्नागिरीच्या हापूस आंब्यांची सध्या फळबाजारात चलती असली, तरी या आंब्यांची खरेदी मोजक्याच ग्राहकांकडून होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल, अशा आवाक्यात असलेल्या केशर आणि नीलम आंब्यांची मोठी उलाढाल लातूरच्या बाजारात आहे. शिवाय, आंध्र आणि कर्नाटकातील तोता-मैना या जातीच्या आंब्यांना ग्राहकांतून विशेष मागणी आहे.
चवीसाठी गोड आणि रसाळ असलेल्या नीलम, केशर त्याचबरोबर तोता-मैना या आंब्यांची मागणी आता वाढली आहे. दिवसेंदिवस फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर हे आंबे दाखल होत आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या आंब्यांची अनेकांनी प्रथमच खरेदी केली. गेल्या दोन दिवसांतील उलाढाल लाखो रुपयांच्या घरात आहे. (प्रतिनिधी)