औरंगाबादेत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी १८ मे पासून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 03:44 PM2018-04-18T15:44:46+5:302018-04-18T15:46:49+5:30
पुढील जयंतीपर्यंत बसवेश्वरांच्या पुतळ्याचे काम सुरू झाले पाहिजे. तोपर्यंत महापौरांना स्वस्थ बसू देणार नसून मे महिन्यात आंदोलन केले जाईल,असा इशारा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी दिला.
औरंगाबाद : टीव्ही सेंटर चौकातील स्वामी विवेकानंद उद्यानात ११ वर्षे उलटूनही जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवू शकले नाहीत. महापालिकेच्या डोक्यात बसलेला कचरा काढला तरच पुतळा बसेल. प्रत्येक वेळी जयंतीच्या दिवशी नेतमंडळी पुढच्या वर्षी पुतळा बसेल म्हणतात. परंतु आता पुढील जयंतीपर्यंत बसवेश्वरांच्या पुतळ्याचे काम सुरू झाले पाहिजे. तोपर्यंत महापौरांना स्वस्थ बसू देणार नसून मे महिन्यात आंदोलन केले जाईल,असा इशारा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी दिला.
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे बुधवारी (दि.१८) सकाळी ९ वाजता महात्मा बसवेश्वर चौक (आकाशवाणी) येथे अभिवादन सोहळा, ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थावरून प्रा. धोंडे बोलत होते. कार्यक्रमास आ. अतुल सावे, अनिल मकरिये, जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गोविंदअप्पा सोलपुरे, कार्याध्यक्ष शिवा स्वामी कीर्तनकार, अशोक फुलशंकर, अशोक बसापुरे, उमेशअप्पा दारुवाले, उत्तमअप्पा चिकाळे, रवींद्रअप्पा रेडे, प्रभाकर पटणे, शिवदास तोडकर, मारुती धुपे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. धोंडे म्हणाले, गळ्यात लिंग नाही, अशा लोकांनी लिंगायत धर्माची मागणी केली. गर्दीपेक्षा विचारांची दर्दी महत्वाची असून समाजाने जागृत राहिले पाहिजे. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसविण्यासाठी २००७ मध्ये नारळ फोडले. परंतु अजूनही पुतळा बसवू शकले नाही. महापालिका कचऱ्यानेच बेजार झाली आहे. महापालिकेच्या डोक्यात कचरा बसलेला आहे. पुतळ्याचे काम लवकरात लवकर सुरू झाले पाहिजे, त्यासाठी १८ मेपासून महापालिकेसमोर आंदोलन केले जाईल, असे ते म्हणाले.