नवीन तालुक्याच्या हालचाली
By Admin | Published: May 30, 2016 01:06 AM2016-05-30T01:06:44+5:302016-05-30T01:16:19+5:30
वाळूज महानगर : शासकीय स्तरावरून स्वतंत्र वाळूज तालुका करण्याच्या हालचाली सुुरू होताच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
वाळूज महानगर : शासकीय स्तरावरून स्वतंत्र वाळूज तालुका करण्याच्या हालचाली सुुरू होताच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. गंगापूर तालुक्याची आर्थिक नाडी वाळूज औद्योगिक क्षेत्र असल्याने स्वतंत्र वाळूज तालुक्यावरून दोन परस्परविरोधी गट सक्रिय झाले आहेत. यासंदर्भात वाळूज महानगर वकील संघ कृती समितीतर्फे सोमवारी वाळूज येथील स्मॉल वंडर स्कूल येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून येणाऱ्या काळात हे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
वाळूज महानगरातील नागरिकांना छोट्या-मोठ्या शासकीय कामांसाठी औरंगाबाद, गंगापूर अशा चकरा माराव्या लागतात. या भागात स्वतंत्र रजिस्ट्री कार्यालय, तहसील कार्यालय व न्यायालय उभारण्याची मागणी वाळूज महानगर वकील संघ कृती समितीने पूर्वीच करून त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. आता स्वतंत्र वाळूज तालुका निर्मितीच्या शासकीय स्तरावरून हालचाली सुरू होताच तालुका निर्मितीवरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. गंगापूर तालुक्याची आर्थिक नाडी वाळूज औद्योगिक क्षेत्र आहे. औद्योगिक क्षेत्रासारखा विकसित व जास्तीचा महसूल देणारा भागच दूर गेला तर तालुका आर्थिकदृष्ट्या दुबळा होईल व विकासापासून दूर राहील, या भीतीपोटी तालुक्यातील काही मंडळी अखंड गंगापूर तालुका कृती समितीच्या माध्यमातून स्वतंत्र वाळूज तालुका निर्मितीस विरोध करीत आहेत. दुसरीकडे वाळूज महानगर वकील कृती समिती स्वतंत्र वाळूज तालुका निर्मितीच्या बाजूने उभी राहिली आहे.
वाळूज महानगर वकील संघ कृती समितीतर्फे सोमवारी सकाळी १०.३० वाजता वाळूज येथील स्मॉल वंडर स्कूल येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन वकील संघ कृती समितीचे अध्यक्ष अॅड. महावीर कांकरिया, योगेश बोहरा, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, जनार्दन निकम, ज्ञानेश्वर बोरकर, सुरेश राऊत, गौतम चोपडा, प्रवीण दुबिले, संतोष लोहकरे, मोहनीराज धनवटे, मनोज जैस्वाल, खालेद पठाण, शिवप्रसाद अग्रवाल आदींनी केले.
गंगापूर तालुक्याचे विभाजन होऊन स्वतंत्र वाळूज तालुका झाल्यास या ठिकाणी स्वतंत्र न्यायालय, रजिस्ट्री कार्यालय व तहसील इ. सरकारी कार्यालये निर्माण होतील. याच्याशी निगडित असलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांना चालना मिळेल. दुसरीक डे जाणारा महसूल येथेच जमा होईल व विकासकामांना गती मिळेल.