सिंचन अनुशेष दूर करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:13 AM2017-07-21T00:13:43+5:302017-07-21T00:20:50+5:30
हिंगोली : मागील अडीच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आ.तान्हाजी मुटकुळे यांना सिंचन अनुशेष मान्य करून घेण्यात यश मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील अडीच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आ.तान्हाजी मुटकुळे यांना सिंचन अनुशेष मान्य करून घेण्यात यश मिळाले आहे. आता तो दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने काही नवे प्रकल्प जिल्ह्यात उभे राहण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला मुद्दा होता. त्यासाठी मागील अडीच वर्षांपासून आ.तान्हाजी मुटकुळे यांनीही जोरदार पाठपुरावा चालविला होता. त्यासाठी अनेकदा राज्यपाल के. विद्यासागर राव यांचीही त्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर या अनुशेषाला मान्यता देण्यासाठी मार्गदर्शक सूचना शासनाकडून राज्यपालांनी मागविल्या होत्या. ३ जुलै २0१७ रोजी त्याचाही मसुदा त्यांना सादर झाला आहे.
आता हा अनुशेष दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात जलसंपदा व जलसंधारण विभागामार्फत हाती घ्यावयाच्या प्रकल्पांची यादी, प्रकल्प उभारणीचे वार्षिक नियोजन, प्रस्तावित केलेल्या प्रत्येक प्रकल्पाची सिंचनक्षमता, हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी अथवा वर्षे तसेच त्यासाठी लागणारा निधी याची माहिती राज्यपालांचे सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडे मागितली आहे. तर जलसंपदा, जलसंधारण व रोहयो विभागासही ही बाब कळविली आहे.
मागील काही दिवसांपासून या सिंचन अनुशेषावरून जोरदार चर्चा होत होती. नुसत्याच चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात होते. मात्र यात काहीच होणार नाही, अशीही पुस्तीही जोडली जात होती. मात्र अखेर त्यात एकेक पुढचे पाऊल पडत असल्याने त्या सर्व बाबींना छेद देणारी ही बाब असून ही प्रक्रिया वेळेत झाल्यास निदान अनुशेष व निधीची तरतूद तरी होईल, हे मात्र नक्की.