‘सीओं’च्या दालनात आंदोलन
By Admin | Published: May 20, 2017 12:45 AM2017-05-20T00:45:37+5:302017-05-20T00:47:05+5:30
कळंब : शहरातील कचरा तसेच नाली सफाई न केल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला व शहरात रोगराई पसरत असल्याचा आरोप करीत काही युवकांनी आंदोलन केले
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : शहरातील कचरा तसेच नाली सफाई न केल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला व शहरात रोगराई पसरत असल्याचा आरोप करीत काही युवकांनी आज नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ‘मच्छरदाणी लगाव’ आंदोलन केले.
शहरात मागील काही महिन्यांपासून न.प. प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत, नाली सफाई होत नाही, तसेच कीटकनाशकांची फवारणी केलेली नाही. परिणामी शहरातील सर्व भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची संख्या वाढून साथीचे आजार होत आहेत. मागील काही दिवसात शहरात यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. नळाला येणारे दूषित पाणीही या रोगप्रसारासाठी कारणीभूत ठरते आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन नगर परिषद प्रशासनाने त्वरित कार्यवाहीचे पाऊल उचलावे, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी नगर परिषदेकडे यावेळी निवेदनाद्वारे केली.
निवेदनावर अॅड. मनोज चोंदे, सुधाकर साबळे, गोविंद चौधरी, गजानन चोंदे, हर्षद अंबुरे, शंकर कदम, शिवप्रसाद बियाणी, गजानन फाटक, दीपक यादव, उदयचंद्र खंडागळे यांच्या सह्या आहेत. यावेळी आंदोलनकर्त्या युवकांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना या अस्वच्छतेचा निषेध म्हणून देण्यासाठी मच्छरदाणी आणली होती. परंतु मुख्याधिकारी कार्यालयात नसल्याने त्यांच्या दालनात ही मच्छरदाणी लावण्यात आली. यानंतरही प्रशासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या युवकांनी दिला.