खासदार दत्तक आडगावला पाच वर्षांपासून विकासाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:07 AM2021-01-25T04:07:02+5:302021-01-25T04:07:02+5:30
विजय थोरात नाचणवेल : साधारण सहा वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी कन्नड तालुक्यातील आडगाव (पि.) गावाला दत्तक घेतले. ...
विजय थोरात
नाचणवेल : साधारण सहा वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी कन्नड तालुक्यातील आडगाव (पि.) गावाला दत्तक घेतले. मात्र, सहा वर्षांपासून या गावाला विकासाची प्रतीक्षा आहे. गावात जी काही कामे झाली तीदेखील अर्धवटच आहेत. रस्ता, चोकअप झालेली ड्रेनेज लाइन, अशुद्ध पिण्याचे पाणी या समस्यांनी आडगाववासीय त्रस्त झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार दत्तक ग्राम योजना जाहीर केली. त्याअंतर्गत प्रत्येक खासदारांनी आपल्या मतदारसंघातील दोन गावे दत्तक घेऊन त्याचा विकास करावा, असा उद्देश होता. तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांना अनेक कार्यकर्त्यांनी आपले गाव या योजनेसाठी निवडावे. अशी गळ घातली. त्यामुळे खासदार दत्तक गाव निवडण्यासाठीच कित्येक महिन्यांचा कालावधी लागला. चर्चेची गुऱ्हाळे, खलबते व रुसवे-फुगवे पार पडल्यानंतर अखेर सैनिकांचे गाव म्हणून कन्नड तालुक्यातील आडगाव (पि.) हे गाव दत्तक घेतले गेले.
विकासाबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन अच्छे दिन येतील, असे स्वप्न उराशी बाळगलेल्या आडगाववासीयांच्या पदरी मात्र सहा वर्षांनंतरही निराशाच पडलेली आहे. गावाचा आदर्श गाव योजनेत समावेश झाल्यानंतर सरकारकडून गावविकासासाठी मोठ्या योजनांची घोषणा केली. खासदार, आमदार व जिल्हाधिकारी यांचे दौरेही झाले. मोठमोठी आश्वासने दिली गेली. मात्र एकही आदर्श योजना या गावात राबविली गेली नाही.
तुंबलेल्या गटारी, ब्लॉक झालेली ड्रेनेज लाइन
आदर्श ग्राम योजनेत आडगावचा समावेश झाला आहे. काही ठिकाणी अजूनही विकास पोहोचलाच नाही. तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी गावातील काही कामे केली. मात्र, त्या निकृष्ट कामाची झळ आता गावकऱ्यांना बसू लागली आहे. एव्हाना त्याचा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. हगणदारीमुक्त गाव करण्यासाठी टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाइनमधील पाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने ती जागोजागी ब्लॉक होऊन फुटू लागली आहे. ड़्रेनेज लाइनचे घाण पाणी पेयजलवाहिनीत मिसळू लागले आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नागरिक म्हणतात !
शौचालयाच्या पाण्याचा निचरा करणारी ड्रेनेज लाइन जागोजागी ब्लॉक झाली आहे. आमच्या घरासमोरचे चेंबर वारंवार उघडावे लागते. ड्रेनेज लाइन जवळूनच पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन गेली असून, दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. - मीनाबाई तायडे, ग्रामस्थ
चोकअप झालेल्या ड्रेनेज लाइनच्या दुर्गंधीमुळे गावकरी त्रस्त आहेत. मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे, तर गावातून तशा तक्रारीदेखील येऊ लागल्या आहेत. वेळोवेळी तक्रारी करूनही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. गाव आदर्श नाही तरी कमीतकमी पूर्वीप्रमाणे स्वच्छ व नीटनेटके व्हायला हवे. - अशोक भोसले, ग्रामस्थ
फोटो :