खा. इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार? ओवेसींकडे व्यक्त केली इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 02:35 PM2024-02-16T14:35:18+5:302024-02-16T14:37:02+5:30
मुंबईतील MIM च्या कार्यकर्त्यांसोबत छत्रपती संभाजी नगरमध्ये गुरुवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली.
छत्रपती संभाजीनगर: आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच AIMIM पक्षातून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) आगामी लोकसभा निवडणूकमुंबईतून लढवण्याची शक्यता आहे. स्वतः जलील यांनी पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्याकडे उत्तर मुंबईतून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत मुंबईतील एमआयएम कार्यकर्त्यांची छत्रपती संभाजीनगरात बैठकही झाली.
मुंबईच्या एमआयएम कार्यकर्त्यांसोबत छत्रपती संभाजी नगरमध्ये गुरुवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लढवं, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचे जलील यांनी सांगितले. तसेच, संभाजीनगर मधून एमआयएमने कोणताही उमेदवार उभा केला तरी तो निवडून येऊ शकतो, अशी प्रतिक्रिया जलील यांनी एका वृत्तवाहिनीशो बोलताना दिली.
जे आमच्यावर भाजपची B टीम असल्याचा आरोप करायचे, ते आज भाजपसोबत गेले आहेत. अशोक चव्हाणांसारखे लोक सुरुवातीपासून आरएसएससी संबंधित आहेत, फक्त सेक्युलरीझमचा बुरखा घालून लोकांचा राजकारणासाठी वापर करताहेत. सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये एमआयएम पक्ष इतर ठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक झाली. 18 फेब्रुवारीला ओवेसींची अकोल्यात सभा आहेत, त्यात मतदार संघाबाबत स्पष्ट निर्णय होईल, अशी माहिती जलील यांनी दिली.
तसेच, लोकसभेसाठी एमआयएम महाराष्ट्रात दहापेक्षा अधिक उमेदवार देणार असून, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धुळे मालेगाव आणि मुंबईमध्ये चार लोक मतदार संघावर पक्षाचे लक्ष असल्याची माहिती जलील यांनी दिली. तसेच, त्यांनी यावेळी मुंबईचा खासदार होण्याची इच्छाही बोलून दाखवली आहे. त्यामुळे जलील यांनी मुंबईतून निवडणूक लढवल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणता उमेदवार असेल, हे पाहणे महत्वाचे आहे.