इम्तियाज जलील यांची संपत्ती झाली दुप्पट; खैरे, भुमरेंपेक्षा संपत्ती मात्र कमीच
By विकास राऊत | Published: April 25, 2024 03:36 PM2024-04-25T15:36:29+5:302024-04-25T15:37:04+5:30
७५ हजार रुपये जलील यांच्याकडे तर पत्नीकडे २५ हजार रुपये रोख रक्कम आहे.
छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे उमेदवार खा. इम्तियाज जलील यांनी बुधवारी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात स्थावर व जंगम मालमत्तेसह उत्पन्नाच्या स्रोतानुसार त्यांची कुटुंबासह असलेली संपत्ती ४ कोटी १५ लाख ४४ हजार १२२ रुपये असल्याचे दर्शविले आहे. त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती व मानधन आहे. पत्नी रुमी फातेमा यांच्या उत्पन्नाचा स्रोत शिकवणी असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. गेल्या निवडणुकीत २ कोटी ३५ लाखांची मालमत्ता असल्याचे जलील यांनी जाहीर केले होते.
खा. जलील यांच्या स्वत:कडे स्थावर व जंगम मालमत्ता मिळून ३ कोटी २४ लाख ३१ हजार १९० रुपयांची तर पत्नीकडे ९१ लाख ९ हजार ९३२ रुपयांची मालमत्ता आहे. शेती व बिगरशेती मालमत्तांचे विवरण त्यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडले आहे. ७५ हजार रुपये जलील यांच्याकडे तर पत्नीकडे २५ हजार रुपये रोख रक्कम आहे. उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे व शिंदेसेनेचे उमेदवार पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यापेक्षा जलील यांची संपत्ती कमीच असल्याचे दिसते आहे.
जंगम मालमत्ता किती?
जलील यांच्याकडे किती?.................पत्नीकडे किती?
१,०४,३४,१९० ...............२६,०९,९३२
स्थावर मालमत्ता किती?
जलील यांच्याकडे किती? पत्नीकडे किती?
२ कोटी २० लाख................... ६५ लाख
किती कर्ज आहे?
जलील यांच्यावर विविध वित्त संस्थांचे २४ लाख ७४ हजार रुपयांचे कर्ज आहे. यात चारचाकीसाठी बँकेच्या कर्जाचा समावेश आहे. घरबांधणीसाठी व हातउसणे रक्कम कर्जरूपी असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. दोन चारचाकी व दोन दुचाकी त्यांच्याकडे आहेत.
८० ग्रॅम सोने आहे...
सोने व मौल्यवान वस्तूंचे वजन आणि किमतीचा तपशील देताना जलील यांनी स्वत:कडे सोने नसल्याचे सांगितले आहे. तर पत्नीकडे २ लाख ७० हजार रुपयांचे ८० ग्रॅम सोने असल्याचे सांगितले आहे.
उमेदवार : खा. इम्तियाज जलील
पक्ष : एमआयएम
वय : ५५
शिक्षण : एम.कॉम, एम.बी.ए., एम.ए.सी.जे., डॉ.बा.आं.म.वि.
गुन्हे : ४, शिक्षा नाही.