विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चंद्रकांत खैरेंना खासदार भुमरेंचं खुलं आव्हान; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 06:39 PM2024-07-28T18:39:10+5:302024-07-28T18:40:43+5:30

काही दिवसांपूर्वीच खैरे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं.

MP sandipan Bhumre open challenge to Chandrakant Khaire who expressed his desire to contest the Assembly election | विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चंद्रकांत खैरेंना खासदार भुमरेंचं खुलं आव्हान; म्हणाले...

विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चंद्रकांत खैरेंना खासदार भुमरेंचं खुलं आव्हान; म्हणाले...

Sandipan Bhumre ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना पराभूत केल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही त्यांना चितपट करणार असल्याचा दावा छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच खैरे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. मात्र चंद्रकांत खैरेंना आता मातोश्रीवर कोणीही विचार नसून त्यांना फक्त आधी तिकीट आणून दाखवावं, असं आव्हान खासदार भुमरे यांनी दिलं आहे.

चंद्रकांत खैरेंवर हल्लाबोल करताना संदिपान भुमरे म्हणाले की, "खैरेंनी निवडणुकीला उभं राहू नये, असा माझा त्यांना सल्ला आहे. त्यांनी आता फक्त नेतेगिरी करावी. कारण खैरेंना आता मातोश्रीवरही कोणी विचारत नाही. ते जर विधानसभा निवडणुकीला उभे राहिलेच तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल.  औरंगाबाद पश्चिममध्ये पहिल्यांदा खैरेंनी उमेदवारी मिळवून दाखवावी आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू संजय शिरसाट काय आहे आणि तुम्ही कोण आहात," असा हल्लाबोल भुमरे यांनी केला आहे.

निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करताना खैरेंनी काय म्हटलं आहे? 

शिवसेनेतील फुटीनंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास मी छत्रपती संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा नुकतीच खैरे यांनी केली. या मतदारसंघातील विद्यमान आमदाराने पक्षासोबत गद्दारी केल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे, असं खैरे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेतील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोन नेत्यांमधील संघर्ष नवा नाही. लोकसभेच्या तिकिटावरूनही या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष रंगला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरूनही हे दोन नेते आमने-सामने येण्याची शक्यता आहे. कारण छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वीच अंबादास दानवे यांनी भाजपच्या राजू शिंदे यांना पक्षात घेतलं आहे. दानवे यांच्याकडून या मतदारसंघासाठी आगामी निवडणुकीत राजू शिंदे यांचेच नाव सुचवले जाण्याची शक्यता आहे. असं असताना आता खैरे यांनीही इथून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने पुन्हा एकदा खैरे-दानवे संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
 

Web Title: MP sandipan Bhumre open challenge to Chandrakant Khaire who expressed his desire to contest the Assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.