खासदारकीमुळे महायुतीचे मनोबल वाढले
By Admin | Published: June 10, 2014 12:13 AM2014-06-10T00:13:23+5:302014-06-10T00:55:17+5:30
उन्मेष पाटील , कळंब जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कधीही पराभव न पाहणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांना सव्वादोन लाख मतांनी पराभूत करून महायुतीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर झेंडा फडकविला आहे.
उन्मेष पाटील , कळंब
जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कधीही पराभव न पाहणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांना जवळपास सव्वादोन लाख मतांनी पराभूत करून महायुतीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर झेंडा फडकविला आहे. उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघावर सध्या शिवसेनेचे वर्चस्व असून, लोकसभेतील विजयामुळे महायुतीतील नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांचेही मनोबल वाढले आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळी, कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद-कळंब मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी तगडी फिल्डींग लावली असून, गावपातळीवर बुथनिहाय मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
वास्तविक उस्मानाबाद तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला तर कळंब तालुका हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षासारख्या पुरोगामी विचारांना मानणारा तालुका होता. १९९५ साली युतीच्या लाटेत कळंब मतदारसंघातून प्रथमच शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर १९९९ साली ‘अबकी बारी, अटल बिहारी’चा नारा देत झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. २००४ च्या निवडणुकीत लाट नव्हती; परंतु, सेनेला मानणारा मतदार तयार झाल्याने यावेळी सेनेचा उमेदवार निवडून आला. याउलट उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघावर मात्र माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता कायम ठेवली होती. २००९ साली उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघ एक झाला आणि या निवडणुकीत शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर यांनी माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही मोदी लाट पुन्हा सेनेसाठी धाऊन आली. या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कोण, प्रचारात मुद्दे काय आहेत, प्रचार कोण करतो आहे, हे ग्राह्य न धरता मतदारांनी मोदी फॅक्टरला कौल दिला. त्यामुळे महायुतीचा उमेदवार विजयी झाल्यानंतर कोणत्याही महायुतीच्या पुढाऱ्याची या विजयाचे क्रेडीट घेण्यासाठी पुढे येण्याची हिंमत झाली नाही. या निवडणुकीत उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातून प्रा. गायकवाड यांना सुमारे वीस हजारांचे मताधिक्य मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे राहणार आहे. यावेळी पुन्हा महायुती विरूध्द आघाडी, असे चित्र दिसणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर उमेदवार राष्ट्रवादीचाच राहणार आहे. पण, काँग्रेसमध्येही इच्छुकांची भाऊगर्दी आहे. कहींनी अपक्ष म्हणूनही निवडणुकीचे बाशिंग बांधण्याची तयारी सुरू केली आहे.
कळंब तालुका हा १९९५ चा अपवाद वगळता नेहमीच सत्तेच्या विरोधात राहिलेला तालुका आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वारे कोठे आहे, त्याच्या विरोधात तालुक्यातील मतदार मतदानाचा कौल देतो, असा अनुभव आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत होणारी फाईट लक्षणीय असणार आहे. याही निवडणुकीत आ. राणाजगजितसिंह पाटील विरूध्द आ. ओम राजेनिंबाळकर अशीच लढत होण्याची शक्यता आहे. सेनेकडून अन्य काहीजण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, विशेषत: आ. रवींद्र गायकवाड यांना मानणारा गट यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला याही निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सहकार्य मिळणार नसल्याचे लोकसभेच्या निवडणुकीतच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला स्वबळावर ही निवडणूक लढवावी लागणार आहे. हे ओळखूनच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद-कळंब मतदारसंघात प्रचारयंत्रणा राबविण्यास प्रारंभ केला होता. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीतही काही अंशी दिसून आला.
एकूणच उस्मानाबाद-कळंब मतदारसंघात महायुती विरूध्द आघाडी अशी लढत असली तरी लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बसपाचा ‘हत्ती’ किती जोर लावणार आणि अपक्ष म्हणून कोण रिंगणात उतरणार, यावरच निवडणुकीची रंगत ठरणार आहे.