खासदारांचा ट्वीटरवर, तर आमदारांचा फेसबुकवर धुरळा; सोशल मीडियातून लोकप्रतिनिधी जनसंपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 04:04 PM2021-08-10T16:04:55+5:302021-08-10T16:27:40+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर थेट सोशल होण्याऐवजी सोशल मीडियातून लोकप्रतिनिधी जनसंपर्काकडे वळले आहेत.
- विकास राऊत
औरंगाबाद : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सोशल मीडियात राजकारण आणि समाजकारणाचा धुरळा उडवित आहेत. त्यात खासदार फेसबुक आणि ट्वीटरवरवर, तर काही आमदार केवळ फेसबुकवरच सक्रिय आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर थेट सोशल होण्याऐवजी सोशल मीडियातून लोकप्रतिनिधी जनसंपर्काकडे वळले आहेत. जिल्ह्यात विधानसभेवर निवडून गेलेले ९ आमदार आहेत. लोकसभेवर १ आणि राज्यसभेवर १ खासदार आहे. राज्य सरकारमधील दोन मंत्री जिल्ह्यात असून एक केंद्रीय राज्यमंत्री आहेत. एमआयएम ( MIM ) आणि भाजपा (BJP ) खासदारांचे ट्वीटरवर हॅण्डल रोज अपडेट असते, तर आमदारांमध्ये भाजपाचे लोकप्रतिनिधी ट्वीटरवर आणि फेसबुकवर सक्रिय आहेत. शिवसेनेत एक-दोन आमदार वगळता दोन्ही माध्यमांवर कुणीही जास्त सक्रिय नाही. बहुतांश आमदारांनी स्वत:चे फेसबुक पेज तयार केले आहे.
कोण अॅक्टिव्ह, कोण इनअॅक्टिव्ह
रोहयो मंत्री संदिपान भूमरे ( Sandipan Bhumare ) सोशल मीडियात अॅक्टिव्ह आहेत. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) हे फक्त फेसबुकवर अपडेट आहेत. माजी विधानसभा अध्यक्ष आ. बागडे ( Haribhau Bagade ) यांचे ट्वीटरवर खाते आढळून आले नाही. तसेच शिवसेनेचे आ. राजपूत, आ. बोरनारे यांचेही खाते ट्वीटरवर आढळले नाही.
केंद्रीय राज्यमंत्र्यांचे रोज ट्वीट
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagvat karad ) हे मंत्री झाल्यापासून रोज ट्वीटरवर अपडेट होत आहेत. जिल्ह्याच्या विविध मागण्यांबाबत केंद्र सरकारकडे ते करीत असलेला पाठपुरावा ते ट्वीट करतात.
खासदारांचे फॉलोअर्स जास्त
खा. इम्तियाज जलील ( Imtiaz Jalil ) यांचे ट्वीटरवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. ते फेसबुकवर सुध्दा सक्रिय असून त्यांच्या प्रत्येक पोस्टला समर्थकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. ते रोज ट्वीट करतात हे विशेष.
ट्वीटरवर जैस्वाल पिछाडीवर
शिवसेनेचे आ. जैस्वाल ( Pradip jaiswal ) फेसबुकवर अॅक्टिव्ह असले तरी, ते ट्वीटरवर मागे पडले आहेत. तसेच आ. बंब ( Prashant Bamb ) ट्वीटरवर मागे आहेत. त्यांचे फॉलोअर्स देखील कमी आहेत.
जवळपास सर्वांचीच वॉररूम
सोशल मीडियातील जनसंपर्क सांभाळण्यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधींनी वॉररूम केलेली आहे. काही लोकप्रतिनिधी स्वत: ट्वीट करतात हे विशेष.
खा. इम्तियाज जलील
फेसबुक - ३१५३
ट्वीटरवर - १ लाख ५६ हजार
खा. डॉ. भागवत कराड
फेसबुक - ७२८१९
ट्वीटरवर - १० हजार
औरंगाबाद पूर्व आ. अतुल सावे
फेसबुक - ४७४९
ट्वीटर - ४७१९
औरंगाबाद मध्य- आ. प्रदीप जैस्वाल
फेसबुक - ६१४२
ट्वीटर - ४८०
औरंगाबाद पश्चिम- आ. संजय शिरसाट
फेसबुक - ४३१४
ट्वीटर - ५१२७
पैठण- आ. संदिपान भूमरे
फेसबुक - ५२१२
ट्वीटर - ४७७०
गंगापूर - आ. प्रशांत बंब
फेसबुक - १५८५९
ट्वीटरवर - ४२
वैजापूर - आ. रमेश बोरनारे
फेसबुक - ३३६४
ट्वीटर - खाते आढळले नाही
कन्नड - आ. उदयसिंग राजपूत
फेसबुक - ४९५२
ट्वीटर - खाते आढळले नाही
सिल्लोड - आ. अब्दुल सत्तार
फेसबुक - ६०३२
ट्वीटर - खाते आढळले नाही
फुलंब्री - आ. हरिभाऊ बागडे
फेसबुक - १३०००
ट्वीटर - खाते आढळले नाही