MPSC Exam Postponed: नियम पाळून सर्व व्यवहार चालू मग एमपीएससी परिक्षा का नको ?; पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 05:05 PM2021-03-11T17:05:17+5:302021-03-11T17:06:09+5:30
MPSC Exam Postponed: एमपीएससी परिक्षा रद्द केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
औरंगाबाद/ बीड : राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा रद्द करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. राज्यात कोरोनाचे नियम पळून सर्व व्यवहार चालू आहेत मग एमपीएससी परीक्षा का नको ? असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परिक्षा येत्या १४ मार्च रोजी घेण्यात येणार होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत सरकारने ही परिक्षा अचानक रद्द केली. यापूर्वी दोन वेळा ही परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. सलग तीन वेळा परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांची ठिकठिकाणी आंदोलने सुरु झाली आहेत. आता माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सुद्धा हा निर्णय अत्यंत चुकीचा असून विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे असे ट्विट केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत #MPSC रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने त्याला नापसंती व्यक्त करत आहे. pic.twitter.com/UWe4kDzdJJ
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 11, 2021
एक व्हिडिओ ट्विट करत त्या म्हणाल्या, 'एमपीएससीचा अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थ्यी हे ग्रामीण भागातील आहेत, अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत पुणे किंवा अन्य शहरात राहून करिअर घडविण्यासाठी अतिशय मेहनत घेऊन रात्रंदिवस अभ्यास करतात. कोरोनाचे नियम पाळून इतर सर्व व्यवहार चालू आहेत मग परिक्षा का नको ? असा सवाल त्यांनी केला. परिक्षा रद्द केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वय निघून जातील, त्यांची मेहनत व्यर्थ जाईल तसेच त्यांचे भविष्य देखील अंधःकारमय होईल. सरकारच्या या निर्णयाने सर्वच विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, त्यांना न्याय द्यावा असेही मुंडे म्हणाल्या.