शहर पोलीसवर मात करीत एमआर इलेव्हन अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:31 AM2018-01-15T00:31:46+5:302018-01-15T00:32:40+5:30
अॅडव्होकेटस् स्पोर्टस् अँड कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित गरवारे क्रीडा संकुलावर झालेली टी २0 औद्योगिक क्रिकेट स्पर्धा एमआर इलेव्हन संघाने जिंकली.
औरंगाबाद : अॅडव्होकेटस् स्पोर्टस् अँड कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित गरवारे क्रीडा संकुलावर झालेली टी २0 औद्योगिक क्रिकेट स्पर्धा एमआर इलेव्हन संघाने जिंकली. एमआर इलेव्हन संघाने अंतिम सामन्यात शहर पोलीस ब संघावर ५ गडी राखून मात केली. पंकज फलके मालिकावीर ठरला. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आदित्य कराडखेडकर व फलंदाज म्हणून अजय कवाळे मानकरी ठरले.
शहर पोलीस ब संघाने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ८ बाद १२१ धावा केल्या. त्यांच्याकडून शेख अहमदने २२ चेंडूंत २ षटकार व ५ चौकारांसह ४१, रिझवान अहमदने १६ धावा केल्या. एमआर इलेव्हनकडून सय्यद फिरदौस आणि व्यंकटेश सोनवलकर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एमआर इलेव्हनने विजयी लक्ष्य १३.५ षटकांत ५ गडी गमावून १२३ धावा करीत पूर्ण केले. त्यांच्याकडून ऋषिकेश नायरने २७ चेंडूंत २ षटकार व ७ चौकारांसह ५७ व शेख वसीमने १७ चेंडूंत एक षटकार व ३ चौकारांसह २६ धावा केल्या. अब्दुल गफूरने नाबाद ११ धावा केल्या. शहर पोलीसकडून शेख रिझवानने १८ धावांत २ गडी बाद केले. अलीम, अकबर व अजय कवाळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अंतिम सामन्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. याप्रसंगी गोपाल पांडे, गणेश अनसिंगकर, उदय पांडे, बाळासाहेब वाघमारे, शेख जमशीद व वकील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.