खासगी गट नंबरमधील उद्योगाला महावितरणचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:59 PM2019-06-10T23:59:46+5:302019-06-11T00:00:34+5:30

महावितरणच्या सिडको उपकेंद्रातील रोहित्र जळाल्याने वडगाव कोल्हाटीमधील खाजगी गट नंबरमधील उद्योगाचा वीजपुरवठा तब्बल २४ तास खंडित होता. उत्पादन ठप्प पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप लघु उद्योजकांनी केला आहे.

MSEDC shock to the private group number | खासगी गट नंबरमधील उद्योगाला महावितरणचा शॉक

खासगी गट नंबरमधील उद्योगाला महावितरणचा शॉक

googlenewsNext
ठळक मुद्देवडगाव : ट्रान्सफार्मर जळाल्याने २४ तास वीजपुरवठा खंडित, उत्पादन बंद पडल्याने मोठे नुकसान

वाळूज महानगर : महावितरणच्या सिडको उपकेंद्रातील रोहित्र जळाल्याने वडगाव कोल्हाटीमधील खाजगी गट नंबरमधील उद्योगाचा वीजपुरवठा तब्बल २४ तास खंडित होता. उत्पादन ठप्प पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप लघु उद्योजकांनी केला आहे.
एमआयडीसीत भूखंड मिळत नसल्याने अनेक नवउद्योजकांनी वडगावच्या खाजगी गट नंबरमधील भूखंडावर छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत. मोठ्या कारखान्यांकडून मिळणाऱ्या कामावर हे उद्योग चालतात. महावितरणच्या सिडको उपकेंद्रातील रोहित्राला रविवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत रोहित्र पूर्ण जळाल्याने परिसरातील वीजपुरवठा बंद होता. याचा सर्वाधिक फटका वडगाव कोल्हाटी खाजगी गट नंबरमधील उद्योजकांना बसला. त्रस्त उद्योजकांनी महावितरण कार्यालय गाठून वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. लवकरच वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी उद्योजकांना दिले. परंतु दुुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे रविवारी दिवसभर या उद्योगाचा वीजपुरवठा बंदच होता.
सोमवारी पहाटे वीजपुरवठा सुरू झाल्यावरही विजेची सतत ये-जा सुरू असल्याने यंत्र बंद पडून जॉब खराब झाले. पाटे तुटले. याचा आर्थिक भुर्दंडही उद्योजकांना सहन करावा लागला. महावितरणमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप येथील माधव हादवे, श्रीकांत भांगे, महेंद्र आव्हाड, अभिजित भालेराव, रवींद्र देवरे, विठ्ठल गजरे, संदीप आग्रे, माणिक देशमुख, आश्विन राचतवार, सचिन देशमुख, राजाराम गडरी, शंकर देशमुख, दीपक डहाळे, शरद देशमुख, श्याम सोमवंशी आदी उद्योजकांनी केला आहे.
महावितरणचे उपअभियंता प्रशांत तोडकर यांंनी सांगितले की, सिडको उपकेंद्रातील ५ एमव्हीएचा ट्रान्सफार्मर जळाला. नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी वेळ लागल्याने उद्योगाचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी २४ तास लागले.
उद्योग क्षेत्रासाठी स्वतंत्र वीज द्यावी....
वडगावातील गट नंबर ६७ व ७० मध्ये आॅटोमोबाईल्स, पॅकेजिंग, टूल रूम, मॅन्युफॅक्चरिंग, वेल्डिंग, प्रेस शॉप, फोजर््िांग आदी जवळपास ३५० ते ४०० छोटे-मोठे उद्योग आहेत. या उद्योगांना महावितरणच्या उपकेंद्रातूनच वीजपुरवठा होतो. वापर अधिक असल्याने या भागातील वीजपुरवठा सतत खंडित होतो. याचा परिणाम उत्पादनांवर होतो. येथील त्रस्त उद्योजकांनी महावितरणकडे स्वतंत्र वीज जोडणीची मागणी केली आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊन उत्पादन बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उद्योग क्षेत्रासाठी स्वतंत्र वीज द्यावी, अशी मागणी उद्योजकांमधून केली जात आहे.
काय म्हणतात उद्योजक....
वर्कआॅर्डर रद्द होण्याची भीती....
मोठ्या कारखान्यांवरच लघु उद्योग अवलंबून आहेत. मोठ्या कारखान्याची वेळेत आॅर्डर पूर्ण करणे गरजेचे असते. आम्ही तोडून काम घेतो. वेळेत आॅर्डर पूर्ण केली नाही तर काम भेटत नाही. वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने उत्पादनांवर परिणाम होत आहे. त्यामुळे वर्कआॅर्डर रद्द होण्याची भीती आहे.
रवींद्र देवरे, लघु उद्योजक
--------------
उद्योग चालविणे अवघड....
या भागात १५ ते २० विद्युत डीपी असून, त्यावर १ हजारांच्या जवळपास कनेक्शन आहेत. वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने तासन्तास कारखाने बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे मोठ्या कारखान्यांच्या आॅर्डर वेळेत पूर्ण करणे अवघड झाले आहे. रविवारी उत्पादन बंद पडल्याने मिळालेली आॅर्डर गेली. हा प्रकार असाच सुरू राहिला तर लघु उद्योजकांना उद्योग चालविणे कठीण आहे.
श्रीकांत भांगे, लघु उद्योजक
------------
उद्योजकांचे नुकसान....
उद्योगाचा जवळपास २४ तास वीजपुरवठा बंद होता. कारखाने बंद ठेवावे लागल्याने उत्पादन घेता आले नाही. त्याचबरोबर कामगारही कंपनीत बसून राहिल्याने त्यांच्या वेतनाचा भुर्दंडही उद्योजकांना सोसावा लागला. अनेकांना कामाच्या वर्कआॅर्डर वेळेत पूर्ण करता आल्या नाहीत. केवळ वीज नसल्यामुळे या भागातील लघु उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
माधव हादवे, लघु उद्योजक

Web Title: MSEDC shock to the private group number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.