महावितरणने तीन दिवसांत साडेबाराशे शेतकऱ्यांची केली वीज कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:05 AM2021-02-14T04:05:36+5:302021-02-14T04:05:36+5:30

गंगापूर : तालुक्यात महावितरणने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांतं तब्बल साडेबाराशे शेतकऱ्यांची वीज कपात केल्याने शेतकऱ्यांच्या ...

MSEDCL cuts off power to 1250 farmers in three days | महावितरणने तीन दिवसांत साडेबाराशे शेतकऱ्यांची केली वीज कपात

महावितरणने तीन दिवसांत साडेबाराशे शेतकऱ्यांची केली वीज कपात

googlenewsNext

गंगापूर : तालुक्यात महावितरणने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांतं तब्बल साडेबाराशे शेतकऱ्यांची वीज कपात केल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांवर संकट उभारले आहे. तर शेतकरी वर्गात महावितरणविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे याच तीन दिवसाच्या कालावधीत १५ लाखांची वसुली झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. मात्र अतिवृष्टीने खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. त्यानंतर रब्बी पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली. रब्बी पिकाची वाढ होताना त्याला पाणी देणे आवश्यक आहे, अशाच कालावधीत महावितरणकडून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असल्याने अनेक त्रास सहन करून पाणी द्यावे लागत आहे. त्यात आणखी भरीस भर म्हणजे दि. १० फेब्रुवारीपासून थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ऐन बहरात आलेली पीक कोमजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

यंदा सगळीकडेच रब्बी पीक जोमात आले आहे. मात्र, महावितरणच्या वक्रदृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. तालुक्यात एकूण २७,८०७ नोंदणीकृत वीजग्राहकांकडे सप्टेंबर २०२०प्रमाणे ३९५.६२ कोटी थकबाकी आहे. त्यावरील व्याज शासनाने माफ करून सुधारित निव्वळ थकबाकी २४१.६७ कोटी आहे. 'कृषी धोरण-२०२०' प्रमाणे भरणा केल्यास १३०.०६ कोटी रुपये ग्राहकांना भरावे लागणार आहे. त्याप्रमाणे महावितरणकडून सध्या जोरदार वसुली सुरू आहे. थकबाकी न भरणाऱ्यां शेतकऱ्यांचा वीजपुरवठा थेट खंडित केला जात असून, आतापर्यंत ११० रोहित्रासहित १,२५० शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. याविरोधात अनेक पक्ष संघटनानी आवाज उठवला असून, मोठ्या आंदोलनाची तयारी केली जात आहे.

-----

तीन दिवसांत पंधरा लाखांची वसुली

महावितरणकडून थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दि. १० फेब्रुवारीपासून तालुक्यातील वसुलीचे काम केले जात आहे. महावितरणच्या या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर या तीन दिवसांत गंगापूर महावितरण कार्यालयाने पंधरा लाखांची वसुली केली आहे.

---------

प्रतिक्रिया

यापूर्वी व्याज आणि विलंब शुल्कात सूट दिली जायची, पण क्रांतिकारी 'कृषी वीज धोरण २०२०' नुसार मूळ मुद्दलात सूट दिल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. वीजबिल थकबाकी शेतकऱ्यांनी स्वतःपुढे येऊन वीजबिल भरणा करण्यास हातभार लावावा. या धोरणाप्रमाणे बिले भरणाऱ्या ग्राहकांचा आम्ही सत्कार करून जनजागृती करणार आहोत.

- रवींद्र गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, गंगापूर

लॉकडाऊनमुळे मालाचे भाव पडले असून अतिवृष्टीमुळे रब्बीचे उत्पन्न वाया गेले होते. यातच शासनाकडून अद्याप नुकसानभरपाईदेखील मिळाली नसल्याने आमच्याकडे वीजबिलं भरण्यास पैसे नाही. सक्तीने वीजपुरवठा खंडित केल्यास आम्ही त्याला तीव्र विरोध करणार आहोत.

-भाऊसाहेब पाटील शेळके, शेतकरी

------

Web Title: MSEDCL cuts off power to 1250 farmers in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.