औरंगाबादकरांना महावितरणने दिला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:39 PM2018-10-08T23:39:19+5:302018-10-08T23:41:10+5:30
औरंगाबाद : ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर महावितरणने औरंगाबादकरांना लोडशेडिंग करून सोमवारी अनपेक्षित धक्का दिला. शहरात सोमवारी तब्बल सव्वानऊ तास विद्युत ...
औरंगाबाद : ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर महावितरणने औरंगाबादकरांना लोडशेडिंग करून सोमवारी अनपेक्षित धक्का दिला. शहरात सोमवारी तब्बल सव्वानऊ तास विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला. कोळसा टंचाईमुळे महानिर्मिती कंपनीकडून मागणीनुसार विजेचा पुरवठा होऊ शकला नसल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार महावितरणला तातडीचे भारनियमन करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सूत्रांनी सांगितले.
गेल्या वर्षीदेखील आॅक्टोबरमध्येच भारनियमन राबविण्यात आले होते. आज शहरात राबविण्यात आलेल्या भारनियमनासंबंधी वीज ग्राहकांना महावितरणकडून कोणत्याही पूर्वसूचना देण्यात आल्या नव्हत्या. सकाळी साधारणपणे ९ वाजेच्या सुमारास महावितरणच्या मुख्यालयाकडून अधिकाऱ्यांना तात्काळ भारनियमन करा, अशा सूचना मिळाल्या. त्यानुसार शहरातील महावितरणच्या शहर विभाग क्रमांक- १ व २ मध्ये भारनियमन करण्यात आले. प्रामुख्याने वीज बिल नियमित न भरणारे ग्राहक, विजेचा अनधिकृत वापर आणि वीज गळतीचे प्रमाण अधिक असणारे फिडर (जी-१, जी-२ आणि जी- ३) तात्काळ बंद करण्यात आले. अगोदरच ‘आॅक्टोबर हिट’ आणि त्यात भारनियमनामुळे आज दिवसभर नागरिक वैतागले. कोळशाची टंचाई आणि दुसरीकडे विजेचा वाढलेला वापर यामुळे तातडीचे भारनियमन लागू करण्यात आले. शहर विभाग क्रमांक १ अंतर्गत तब्बल ३३ फिडर बंद करण्यात आले होते. यामध्ये जी-१ अंतर्गत दोन टप्प्यांत पावणेआठ तास, जी-२ अंतर्गत साडेआठ तास आणि जी-३ अंतर्गत सव्वानऊ तास भारनियमन करण्यात आले. वीजनिर्मिती करणाºया संचांना कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संचांना कोळसा मुबलक प्रमाणात प्राप्त होईल, तेव्हा भारनियमन रद्द केले जाईल, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.
चौकट ....
या परिसरात होते भारनियमन
पावर हाऊस उपविभागांतर्गत भडकलगेट, टाऊन हॉल, जयभीमनगर, नूर कॉलनी, नेहरू भवन, जामा मशीद, विद्युत कॉलनी, आरेफ कॉलनी, गौतमनगर, घाटी परिसर, प्रगती कॉलनी, आसेफिया कॉलनी, मकई गेट परिसर, बेगमपुरा, लालमंडी, कुतुबपुरा, जयसिंगपुरा, छावणी उपविभागांतर्गत सिल्क मिल कॉलनी, सादातनगर, राहुलनगर, जालाननगर, महानुभाव आश्रम, दिशा संस्कृती, इटखेडा, तापडिया पार्क, छावणी, नेहरूनगर, ख्रिस्तनगर, चांदमारी, नंदनवन कॉलनी, मिलिंद कॉलेज, पीईएस अभियांत्रिकी कॉलेज, भीमनगर, भुजबळनगर, सातारा तांडा, भावसिंगपुरा, भीमनगर, पेठेनगर, कासंबरी दर्गा, पडेगाव, मिटमिटा, देवगिरी व्हॅली, तारांगण परिसर, शहागंज उपविभागांतर्गत जुना शहाबाजार, राजाबाजार, जिन्सी, कैसर कॉलनी, रणमस्तपुरा, चाऊस कॉलनी, निजामुद्दीन रोड, मदिना मार्केट, घासमंडी, चेलीपुरा, स्टेट टॉकीज, गांधी भवन, आमखास, कबाडीपुरा, किलेअर्क, लेबर कॉलनी, सिटीचौक, लोटाकारंजा, कासारी बाजार, रोहिला गल्ली, फाजलपुरा, एस.टी. कॉलनी, गणेश कॉलनी, रशीदपुरा, आलमगीर कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, रोजाबाग, एन-१२, एसबीएच कॉलनी, मिसारवाडी, रहेमानिया कॉलनी, राममंदिर, यशोधरा कॉलनी, किराडपुरा, मकसूद कॉलनी, हर्सूल, जहांगीर कॉलनी, फातेमानगर, एकतानगर, होनाजीनगर, राजनगर, राधास्वामी कॉलनी, वाळूज उपविभागांतर्गत पंढरपूर, नायगाव, पंढरपूर रोड आदी.
शहर विभाग क्रमांक-२ अंतर्गत नारेगाव फिडर, सिडको (संजयनगर) फिडर, चिकलठाणा फिडर, मोंढा फिडर, निजामोद्दीन फिडर, सेव्हन हिल फिडर, क्रांतीचौक, मोंढा, अहिंसानगर, बायजीपुरा, सुराणानगर आदी परिसरात लोकशेडिंग करण्यात आले.