महावितरणाच्या चुकीने शेतकऱ्याचा हात झाला निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:06 AM2021-01-08T04:06:44+5:302021-01-08T04:06:44+5:30
: शेतकऱ्यावर उपचार सुरू करमाड : औरंगाबाद तालुक्यातील आडगाव सरक येथील शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना विजेच्या धक्क्याने डावा ...
: शेतकऱ्यावर उपचार सुरू
करमाड : औरंगाबाद तालुक्यातील आडगाव सरक येथील शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना विजेच्या धक्क्याने डावा हात निकामी झाला. आडगाव सरक येथील शेतकरी रुस्तुम पठाडे २७ डिसेंबर रोजी गट क्रमांक ८९ मध्ये शेतात बकऱ्या चारत असताना शेतातून ११ केव्ही वीज वाहून नेणाऱ्या खांबाला हात लागला असता ते त्याला चिकटून गंभीर भाजले. त्यांना परिसरातील शेतकऱ्याने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा डावा हात कापावा लागला, तर दोन्ही पाय भाजल्याने अद्याप त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आडगाव सरक येथील गट क्रमांक ८९ मधून शेतीला वीज वाहून नेणारा सिमेंटचा खांब आहे. त्या खांबावर चिनी मातीची चिमणी नसल्यामुळे ती वायर लोखंडी रॉडला बांधली असल्यामुळे त्या जागेवर चिमणी बसविण्याची मागणी अनेक वेळा संबंधित लाइनमन श्रीपाद भोंडे यांच्याकडे केली; परंतु लाइनमनने दुर्लक्ष केल्याने दि.२७ डिसेंबर रोजी अपघात झाल्याने शेतकरी गंभीर जखमी झाले. याविषयी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सिराज पठाण, ताराचंद घडे करीत आहेत.
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी जखमी झाल्याने शेतकऱ्याला उपचारासाठी व पुढील उदरनिर्वाहासाठी नुकसानभरपाई मिळावी व दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी आडगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे. बेंदेवाडी शिवारातही रामधन धनावत यांची दुभती म्हैस समृद्धी महामार्गाच्या कामावर विद्युत पुरवठ्याच्या खांबात वीज प्रवाह उतरल्याने तिला विजेचा धक्का लागल्याने बुधवार (दि. ६) रोजी ती मृत झाली.
फोटो १) लाडसावंगीजवळील आडगाव सरक येथे विजेच्या धक्क्याने जखमी रुस्तुम पठाडे घाटीत उपचार घेत आहेत.
२)वीज वाहून नेणाऱ्या पोलला चिनी मातीचे भांडे ( चिमणी ) नसल्याचे दिसत आहे.