मराठवाड्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेत सत्ताधारी साधणार हॅटट्रिक?
By राम शिनगारे | Published: June 23, 2023 05:13 PM2023-06-23T17:13:46+5:302023-06-23T17:15:03+5:30
२ जुलै रोजी कार्यकारी मंडळासाठी निवडणूक; सत्ताधाऱ्यांचा 'जैसे थे' स्थिती ठेवण्यावर भर
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील राजकारण, समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रावर प्रभाव टाकणाऱ्या सर्वांत मोठ्या शैक्षणिक संस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष, सरचिटणीसांसह २१ सदस्यांच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक २ जुलै रोजी देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात होणार आहे. या निवडणुकीत विद्यमान सत्ताधारीच सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्याची शक्यता असून, अध्यक्षपदी आ. प्रकाश सोळंके, तर सरचिटणीसपदी आ. सतीश चव्हाण यांची तिसऱ्यांदा फेरनिवड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
म.शि.प्र. मंडळावर मागील दहा वर्षांपासून मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांचे संपूर्ण वर्चस्व आहे. त्यांनी सरचिटणीस म्हणून १६ जून रोजी मंडळाची सर्वसाधारण सभा २ जुलै रोजी बोलावली आहे. या सभेत १० जुलै २०२३ ते ९ जुलै २०२८ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, सरचिटणीस, दोन सहचिटणीस, कोषाध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाचे १४ सदस्य निवडले जाणार आहेत. विद्यमान अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. या निवडणुकीत दहा वर्षांपासून सत्ताधारी पदाधिकारीच पुन्हा एखादा अपवाद वगळता सत्तास्थानी येतील. काहींच्या पदांमध्ये बदल होऊ शकतो. तर, काही जण कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदी नव्याने येतील, अशी शक्यताही सूत्रांनी वर्तवली. सत्ताधाऱ्यांचे सर्व काही सुरळीत सुरू असल्यामुळे 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्यावर भर असून, त्यात सरचिटणीस आ. चव्हाण यांचेच पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित होणार आहे.
संस्थेचा आठही जिल्ह्यांत विस्तार
म.शि.प्र. मंडळाच्या विविध माध्यमांच्या शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचा विस्तार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आहे. त्यात प्राथमिक शाळांची संख्या १४, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या ५४, व्यावसायिकसह पारंपरीक महाविद्यालयांची संख्या २३ आणि सीबीएसई शाळांची संख्या ११ एवढी असून, सर्वांची एकूण संख्या १०२ एवढी मोठ्या प्रमाणात आहे.
खंडपीठाने याचिका फेटाळली
२ जुलै रोजी म.शि.प्र. मंडळाच्या निवडणुकीसाठी बोलावलेल्या सर्वसाधारण सभेला स्थगिती देण्यासाठी काही सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, संबंधितांच्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे २ जुलै रोजी मंडळाच्या कार्यकारी समितीसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.