राज्यशासनाच्या MSSC कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या भरतीला ५० टक्के उमेदवार गैरहजर
By योगेश पायघन | Published: August 20, 2022 04:55 PM2022-08-20T16:55:35+5:302022-08-20T16:58:06+5:30
राज्य राखीव पोलीस बल गटाकडून मुल्यांकन, ७ हजार पदांसाठी भरती प्रक्रीयेला सुरूवात
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ७ हजार कंत्राटी सुरक्षारक्षक पदासाठी भरती प्रक्रिया शनिवारी सकाळी सहा वाजता सुरू झाली. पहिल्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील बोलावलेल्या दीड हजारपैकी केवळ साडेसातशे उमेदवारांची मैदानी चाचणीसाठी उपस्थिती होती. ५० टक्के उमेदवारांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध नियोजनामुळे अवघ्या सात तासांत मैदानी चाचणीची प्रक्रीया पुर्ण झाली.
मार्च-एप्रिल २०२० मध्ये नियोजित भरती कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. ७ हजार पदांसाठी राज्यभरातून १ लाख ३३ हजार ६९३ युवकांनी अर्ज आलेले होते. भरतीसाठी मैदानी चाचणीची जबाबदारी राज्यातील ९ राज्य राखीव पोलीस बल गटाकडे देण्यात आली आहे. नियमीत भरतीचा अनुभव असल्याने एसआरपीएफचे शिस्तबद्ध नियोजनाची चुनुक दिसून आली. दीड हजार उमेदवार अग्नीवीर भरतीसाठीही बोलावण्यात येत आहेत. मात्र, ती प्रक्रीया बारा ते १८ तासांपेक्षा अधिक वेळखाऊ असल्याचे दिसून येत असतांना सुरक्षा रक्षक भरतीची प्रक्रीया सुलभतेने व जलदगतीने पार पडल्याचे उमेदवार म्हणाले.
औरंगाबाद येथील गट क्रमांक १४ येथे अनुक्रमे औरंगाबाद, लातूर, बुलडाणा व नांदेड येथील १९ हजार ३२२ तरुणांची मैदानी चाचणी व गुणांकन होणार आहे. दररोज १५०० उमेदवारांना बोलवण्यात आले असून ५ सप्टेंबरला शेवटची चाचणी होणार आहे. सकाळी सहा वाजता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याने सकाळी चार वाजेपासून उमेदवार सातारा परिसरात जमा होत आहेत. राज्य राखीव पोलीस बलाच्या गटाच्या प्रवेशद्वाराजवळ उमेदवारांसाठी टेन्टची, पाणी, माफक दरात नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. समादेशक निमीत्त गोयल यांच्या मार्गदर्शनात पहिल्या दिवशीची प्रक्रीया सुटसुटीत व सुरळीत पार पडली.
सात तासांचे शिस्तबद्ध नियोजन
बोलावण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी व हजेरी घेण्यासाठी पाच पथक होते. तर शाररीक मोजणी करण्यासाठी उंची, वजन, छाती असे प्रत्येकी चार पथके होती. त्यानंतर कागदपत्र पडताळणी करून पन्नासच्या गटाने कवायत मैदान परिसरात १६०० मीटर धावण्याची चाचणी झाली. सुरूवात व शेवटच्या पाॅईंटला दोन रुग्णवाहीका, आरोग्य पथकांची उपस्थिती होती. तर शेवटच्या पाॅईंटवर वेळेनुसार गुणांकन करण्यासाठी गट करण्यात आले होते. बारावीतील टक्क्यांनुसार ५० गुण तर मैदानी चाचणीचे ५० गुण अशा १०० गुणांच्या मुल्यांकन राज्य राखीव पोलीस दलाकडून एकत्रिक गेल्यावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.