एमटीडीसीची ‘कमिटमेंट’; ऐनवेळी ग्रुप रद्द, पण ४ परदेशी पर्यटकांसाठी धावली अख्खी रेल्वे
By संतोष हिरेमठ | Published: November 7, 2023 03:50 PM2023-11-07T15:50:03+5:302023-11-07T15:51:35+5:30
अनेकांच्या भुवया उंचावल्या; या चारही पर्यटकांनी जगप्रसिद्ध वेरुळ लेणीला भेट दिली.
छत्रपती संभाजीनगर : पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी सकाळी पर्यटनाची शाही रेल्वे डेक्कन ओडिसी दाखल झाली आहे. विशेष म्हणजे या रेल्वेत अवघे ४ परदेशी पर्यटक दाखल झाले. या चारही पर्यटकांनी जगप्रसिद्ध वेरुळ लेणीला भेट दिली. चार प्रवाशांसाठी अख्खी रेल्वे धावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा आहेत. स्पा, पार्लर, जीम, विविध पदार्थांची रेलचेल असणारे रेस्टॉरंट या रेल्वेला ‘चार चाँद’ लावत आहे. देशातील शाही रेल्वेपैकी एक असणारी डेक्कन ओडिसी शहरात मार्च २०२० मध्ये आली होती. त्यानंतर ही रेल्वे आलीच नाही. या रेल्वेसंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा केला. अखेर पुन्हा एकदा ही रेल्वे रुळावर आली आहे.
डेक्कन ओडिसी ही शाही रेल्वे ३ वर्षांनंतर पहिल्यांदा गत महिन्यात म्हणजे ६ ऑक्टोबर रोजी २० पाहुणे घेऊन दाखल झाली होती. त्यानंतर सोमवारी ही रेल्वे दुसऱ्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली. मात्र, १६ बोगी आणि ९० पर्यटकांची क्षमता असलेल्या या शाही रेल्वेतून केवळ ४ परदेशी महिला पर्यटक आल्या. त्यांनी वेरुळ लेणीला भेट दिली. गाइड संदीप गायकवाड यांनी लेणीविषयी माहिती दिली. यावेळी टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जसवंत सिंग यांची उपस्थिती होती.
ऐनवेळी ग्रुप रद्द झाला, पण रेल्वे धावली
या डेक्कन ओडिसीने प्रवास करणाऱ्या पर्यटकांचा ग्रुप ऐनवेळी रद्द झाला. मात्र, तरीही पर्यटनासाठी असलेल्या ‘कमिटमेंट’मुळे ४ पर्यटकांसाठीही ही रेल्वे चालविण्यात आली.
- चंद्रशेखर जयस्वाल, महाव्यवस्थापक, एमटीडीसी, मुंबई