कच्च्या रस्त्यावर गुडघाभर चिखल
By Admin | Published: August 4, 2016 11:52 PM2016-08-04T23:52:01+5:302016-08-05T00:15:03+5:30
तालखेड : ग्रामीण भागात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली असते. उन्हाळ्यात ग्रामस्थांना रस्त्याची अडचण जाणवते, मात्र पावसाळ्यात कच्च्या रस्त्यावरुन गावाबाहेर पडणेही मुश्कील बनते
तालखेड : ग्रामीण भागात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली असते. उन्हाळ्यात ग्रामस्थांना रस्त्याची अडचण जाणवते, मात्र पावसाळ्यात कच्च्या रस्त्यावरुन गावाबाहेर पडणेही मुश्कील बनते. माजलगाव तालुक्यातील तालखेडनजीक असलेल्या जामगातांडा रस्त्याची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांना या कच्च्या रस्त्यावरुन चिखल तुडवत ४ ते ५ कि.मी. पायी जावे लागते. हा प्रवास पावसाळा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत चालूच असतो.
माजलगाव तालुक्यातील जामगातांडा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या तांड्यावर जवळपास पाचशे उंबरठे आहेत. तालखेड ग्रामपंचायतअंतर्गत हा तांडा येतो. तांड्यावर राहणाऱ्या ग्रामस्थांना वाहतुकीसाठी चांगला रस्ता नाही. कच्च्या रस्त्यावरुन त्यांना यावे-जावे लागते. सध्या माजलगाव तालुका परिसरात चांगला पाऊस होत आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे तांडा परिसरातील रस्ते चिखलमय झाले आहेत. ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. एखाद्या रुग्णाला शहराच्या ठिकाणी असलेल्या दवाखान्यात न्यावयाचे असल्यास बाजेचा आधार घ्यावा लागतो. तांड्यावरील लोकांनी अनेकवेळा रस्त्याबाबत आग्रह धरला, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. अनेकवेळा आश्वासन देऊनही दुरुस्ती झाली नाही. दुरुस्तीची मागणी विलास जाधव, संजय पवार, राजू राठोड, शिवाजी जाधव यांनी केली. (वार्ताहर)