दर्गाहमध्ये ‘मुगल ग्लास आर्ट’चा ट्रेंड!
By Admin | Published: June 10, 2014 12:32 AM2014-06-10T00:32:39+5:302014-06-10T00:57:13+5:30
औरंगाबाद : मुगल बादशाह हुमायू याने भारतात मुगल आर्टला प्रोत्साहन दिले. ही कला भारतातच नव्हे तर विदेशातही लोकप्रिय ठरली.
औरंगाबाद : मुगल बादशाह हुमायू याने भारतात मुगल आर्टला प्रोत्साहन दिले. ही कला भारतातच नव्हे तर विदेशातही लोकप्रिय ठरली. ऐतिहासिक औरंगाबादेत मोठ्या दर्गाहमधील घुमटाच्या आत ‘मुगल ग्लास आर्ट’चे काम करण्याची क्रेझ मागील काही दिवसांमध्ये कमालीची वाढली आहे. तीन महिन्यांमध्ये चार दर्गाहांमध्ये शिशमहल वर्क करण्यात आले असून, उद्या सर्वांत मोठा घुमट असलेल्या शहानूर हमवी दर्गाहमध्ये काम सुरू होत आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या शहागंज येथील हजरत निझामोद्दीन औलिया दर्गाहमध्ये २५ दिवसांपूर्वी काम सुरू करण्यात आले. तब्बल ५६ फूट गोलाई असलेल्या घुमटाचे काम आज संपले.
‘लोकमत’शी बोलताना कलाकार अब्दुल सत्तार, खालेद मोहंमद, सलमान खान, शब्बीर खान यांनी सांगितले की, या दर्गाहसाठी सुमारे १,२०० फूट काचेचा वापर करण्यात आला.
१ बाय ४ च्या आकारातील ग्लास शीटमध्ये हे काम होते. काच वर्षानुवर्षे चिकटून राहण्यासाठी फेव्हिकॉल, वार्निस, पीयूपी, व्हायटिंग आदी साहित्याचा प्रामुख्याने वापर होतो. घुमटाचे माप घेणे, कलाकुसर करण्यापूर्वी डिझाईन तयार करणे आणि त्यानंतर एक-एक काच कापून चिकटवणे, अशा पद्धतीने हे काम केले जाते. गारखेडा परिसरातील हजरत शहानूर हमवी यांच्या दर्गाहचा घुमट शहरात सर्वांत मोठा आहे.
या घुमटाच्या आतील बाजूला आणि दर्गाहच्या प्रवेशद्वारासमोर ग्लास वर्क करण्यात येणार आहे. हे काम बुधवारपासून सुरू होईल, असे कलाकारांचे प्रमुख अमीन शेख यांनी नमूद केले.
हे काम किमान चार महिने चालणार आहे. सर्व धर्मांचे श्रद्धास्थान असलेल्या या दर्गाहमध्ये दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. अलीकडेच दर्गाहचा ३३७ वा उरूस साजरा करण्यात आल्याची माहिती येथील बुजुर्ग लाला भाई यांनी
दिली.
देशभरात ग्लास वर्कची क्रेझ
अमीन शेख यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कारागिरांनी आजपर्यंत देशभरातील १५० हून अधिक दर्गाहच्या घुमटामध्ये ‘मुगल ग्लास आर्ट’चे काम केले आहे. हे काम दिसायला खूपच आकर्षक असते. त्यामुळे अलीकडे याची मागणी खूप वाढली
आहे.
सर्वांत अवघड वर्क!
कोणत्याही दर्गाहच्या घुमटामध्ये नियोजित डिझाईनमध्ये वेगवेगळ्या रंगांचे काम चिकटवणे सोपे आहे; पण दर्गाहच्या आतील भिंतींवर पवित्र कुराणमधील काही ‘आयात’(अध्याय) लिहिलेले असतात. काचेच्या तुकड्यांमध्ये ते साकारण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अरबी भाषेच्या व्याकरणाला अनुसरून मांडणी करावी लागते. मांडणीत किंचित जरी चूक झाली तरी ती बाब गंभीर मानण्यात येते, असे निझामोद्दीन औलिया दर्गाहमध्ये काम करणाऱ्या कलावंतांनी सांगितले.
मुंबईहून आठ कारागिरांचे एक पथक शहरात तीन महिन्यांपूर्वीच आले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या दर्गाहच्या घुमटाचे काम केले. सहा वेगवेगळ्या रंगांमधील हे नेत्रदीपक काम पाहून अनेक जण अवाक् झाले.
या कलाकारांचे काम पाहून कोणीही मुगल ग्लास आर्टच्या प्रेमात पडेल एवढे अप्रतिम काम या कलाकारांनी केले आहे. कारागिरांच्या पथकाने शहानूर हमवी दर्गाह परिसरातील एका छोट्या दर्गाहचे काम केले. जुना बाजार हेड पोस्ट आॅफिसजवळ हजरत खाजा सय्यद शाह नुरोद्दीन दर्गाहमधील घुमटाचे काम मागील महिन्यांत पूर्ण केले. हे काम पाहून अनेक भाविक आश्चर्यचकित झाले.