राज्यातील तिस-या एफडीएच्या लॅबला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:13 AM2017-12-11T00:13:01+5:302017-12-11T00:13:08+5:30

राज्यातील तिस-या क्रमांकाची अन्न व औषधी प्रशासनाची प्रयोगशाळा (लॅब) सुरू होण्यासाठी सात वर्षांपासून मुहूर्त लागत नाही. नक्षत्रवाडी येथे पूर्ण बांधकाम झालेल्या त्या लॅबचा कोंडवाडा होण्याची वेळ आली आहे.

 Muhurat is the third FDA lab in the state | राज्यातील तिस-या एफडीएच्या लॅबला लागेना मुहूर्त

राज्यातील तिस-या एफडीएच्या लॅबला लागेना मुहूर्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्यातील तिस-या क्रमांकाची अन्न व औषधी प्रशासनाची प्रयोगशाळा (लॅब) सुरू होण्यासाठी सात वर्षांपासून मुहूर्त लागत नाही. नक्षत्रवाडी येथे पूर्ण बांधकाम झालेल्या त्या लॅबचा कोंडवाडा होण्याची वेळ आली आहे.
२०११ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने एफडीएच्या ९ लॅब सुरू करण्याची घोषणा केली. त्यासाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद टप्प्याटप्प्याने करण्याचे ठरले होते. सोबतच ३७ मोबाइल लॅब्सची निर्मिती करण्यात येणार होती. मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, पुणे, अमरावती, जळगाव, कोल्हापूर, नाशिक येथे त्या लॅब्स होण्याचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे.
नक्षत्रवाडीमध्ये शासकीय जागेमध्ये औरंगाबाद विभागासाठी असलेल्या लॅबच्या बांधकामाला सुरुवात झाली. सिव्हिलचे पूर्ण काम करण्यात आले; परंतु इलेक्ट्रिकल्स व फर्निचरच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्यामुळे काम अर्धवट राहिले. या प्रकरणात अर्धवट काम सोडून कंत्राटदाराने पळ काढला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ते काम करण्यात येत होते.
लॅबचे काम बंद पडल्यामुळे त्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित झाले. त्या प्रकरणात दोन अभियंत्यांवर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली. एवढे सगळे महाभारत होऊनही त्या लॅबच्या कामाला मुहूर्त न लागल्यामुळे सद्य:स्थितीत चार मजली बांधकाम केलेली ती इमारत कोंडवाड्याप्रमाणे उभी आहे.
सहआयुक्तांचे मत असे...
अन्न व औषधी प्रशासन (एफडीए)चे सहआयुक्त चंद्रकांत पवार म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वित्त विभागात पतपुरवठ्यावरून काही अडचणी होत्या. त्या अडचणी सुटल्या आहेत. त्या इमारतीत फक्त प्रयोगशाळाच नसेल. तेथे विभागीय आॅफिस, विभागीय प्रयोगशाळा, अन्न व औषधींचे नमुने तपासण्याची व्यवस्था असेल. मुंबई, नागपूर या ठिकाणी मोठ्या लॅबप्रमाणे औरंगाबादची लॅब असणार आहे. लॅब लवकरच सुरू होण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अन्न व औषधीमंत्र्यांचे मत असे...
अन्न व औषधी प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले की, लॅबची पाहणी केली आहे. बांधकाम विभागाचा जागेसंबंधी वाद आहे, तसेच मनुष्यबळाच्या काही अडचणी आहेत. दोन महिन्यांत लॅब सुरू करण्याचा प्रयत्न आहे. खात्याकडे लॅबच्या कामासाठी पैसे पडून आहेत.

Web Title:  Muhurat is the third FDA lab in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.