मानाचा मुजरा ! छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांची भूमी मालोजीराजे भोसले गढीचे बदलणार रूप
By संतोष हिरेमठ | Published: March 18, 2024 11:43 AM2024-03-18T11:43:20+5:302024-03-18T11:44:03+5:30
कामाला सुरूवात : भव्य अशी तटबंदी, प्रवेशद्वार, कारंज्यासह छताची होणार उभारणी
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरुळ याठिकाणी इतिहासाची साक्ष देणाऱ्या श्री. मालोजीराजे भोसले गढीचे लवकरच रूप बदलणार आहे. तब्बल १३ कोटी ६८ लाखांच्या निधीतून या गढीचे जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे.
वेरुळ येथील श्री. मालोजीराजे भाेसले गढी ही छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांची भूमी आहे. वेरुळ लेण्यांच्या पूर्वेस दोन हेक्टर ५९ आर परिसरात ही गढी आहे. हा परिसर राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. मालोजीराजे भोसले गढीच्या परिसरात शहाजीराजे भोसले यांचे स्मारक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मालोजीराजे भोसले गढीच्या संवर्धनाच्या कामाची प्रतीक्षा केली जात होती. अखेर या कामाला मुहूर्त मिळाला आहे.
२००५ मध्ये उत्खनन
याठिकाणी २००५ ते २००६ मध्ये उत्खननात काही अवशेष आढळले होते. या उत्खननात जवळपास ६९ दुर्मिळ पुरातन वस्तू सापडल्या. त्यामध्ये लाल दगडात घडवलेली गणेशमूर्ती, भाग्य रत्ने, मातीचे दिवे, बांगड्या, कांस्य नाणी, चांदीच्या अंगठ्या, घराचा पाया इत्यादींचा समावेश होता. उत्खननात सापडलेल्या वस्तूंचा सखोल अभ्यास करून या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. आता संवर्धनाच्या कामात गढीच्या परिसरात भव्य असे छत उभारून उत्खननात सापडलेल्या भागांचे जतन केले जाईल. याठिकाणी विविध माहिती देणारे फलकही लावले जाणार आहेत. त्याबरोबर भव्यदिव्य अशी तटबंदी उभारली जाणार आहे. कारंजेही लावले जातील.
कामाला सुरूवात
वेरूळ येथील श्री. मालोजीराजे भोसले गढीच्या जतनाचे काम सुरू झाले आहे. सध्या या जागेच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. याठिकाणी संरक्षक भिंत, माहिती फलक आदी कामे केली जाणार आहेत, अशी माहिती राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे यांनी दिली.