छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६० वर्षांवरील तब्बल पाच लाख ज्येष्ठ, मोफत तीर्थयात्रेसाठी किती पात्र?

By संतोष हिरेमठ | Published: July 18, 2024 07:29 PM2024-07-18T19:29:10+5:302024-07-18T19:29:22+5:30

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : जास्त अर्ज आले तर लाॅटरीद्वारे प्रवाशांची निवड

Mukhyamantri Tirthdarshan Yojana: As many as five lakh senior citizens above 60 years of age in Chhatrapati Sambhajinagar district, how many are eligible for free pilgrimage? | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६० वर्षांवरील तब्बल पाच लाख ज्येष्ठ, मोफत तीर्थयात्रेसाठी किती पात्र?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६० वर्षांवरील तब्बल पाच लाख ज्येष्ठ, मोफत तीर्थयात्रेसाठी किती पात्र?

छत्रपती संभाजीनगर : आर्थिक परिस्थितीमुळे गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठांचे तीर्थक्षेत्री जाण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र, राज्यातील सर्वधर्मीयांमधील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा घडविणारी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ जाहीर करण्यात येत आहे. जिल्ह्यात ६० वर्षांवरील तब्बल पाच लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. यातील किती ज्येष्ठ मोफत तीर्थयात्रेसाठी पात्र ठरतील, हे आगामी कालावधीत स्पष्ट होईल.

या योजनेत महाराष्ट्र आणि भारतातील प्रमुख तीर्थस्थळांना भेटी देता येणार आहे. या तीर्थाटनासाठी रेल्वे, तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाईल. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल. जास्त अर्ज आल्यास लाभार्थी निवड लॉटरीद्वारे होईल.

जिल्ह्यातील ज्येष्ठांची संख्या
वय- संख्या

- ६० ते ६९ वर्षे : २,७५,००१
- ७० ते ७९ वर्षे : १,५१,४७४
- ८० ते ८९ वर्षे : ६५,३८७
-९० ते ९९ वर्षे : १६,४६२
-१०० ते १०९ वर्षे : २५८८

किती तीर्थस्थळांचा समावेश?
या याेजनेत भारतातील ७३ आणि महाराष्ट्रातील ६६ तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.

कोणाला मिळेल लाभ?
- वय ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

चारचाकी असेल तर अपात्र
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा निमसरकारी सेवेत कार्यरत आहेत तसेच ज्यांना निवृत्तिवेतन मिळत आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे (ट्रॅक्टर वगळून) त्यांनाही योजना लागू नसेल.

Web Title: Mukhyamantri Tirthdarshan Yojana: As many as five lakh senior citizens above 60 years of age in Chhatrapati Sambhajinagar district, how many are eligible for free pilgrimage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.