बहुमजली इमारतीत फ्लॅटसमोर असेल कार पार्किंगची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:04 AM2021-06-26T04:04:37+5:302021-06-26T04:04:37+5:30
औरंगाबाद : भविष्यात एखाद्या आलिशान अपार्टमेंटमध्ये प्रत्येक मजल्यावरील फ्लॅटसमोर कार पार्किंग केलेली जर दिसली तर आश्चर्य वाटायला नको. ...
औरंगाबाद : भविष्यात एखाद्या आलिशान अपार्टमेंटमध्ये प्रत्येक मजल्यावरील फ्लॅटसमोर कार पार्किंग केलेली जर दिसली तर आश्चर्य वाटायला नको. कारण, आता स्मार्ट सिटीची गरज लक्षात घेऊन भविष्याचा वेध घेणारे नामांकित बांधकाम व्यावसायिक बहुमजली (मल्टी लेव्हल) कार पार्किंग तयार करीत आहेत.
सध्या शहरात पार्किंगची समस्या प्रखरतेने जाणवत आहे. अनेक फ्लॅटधारक असे आहेत की, त्यांच्याकडे एकापेक्षा अधिक कार आहेत. दुचाकी आहेत. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये जागा नसल्याने दुसऱ्या कार रस्त्यावर किंवा मैदानात लावाव्या लागतात. अनेक जुन्या अपार्टमेंटमध्ये पार्किंगला जागाच सोडलेली नाही. जिथे पार्किंग आहे तिथे जागा कमी पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी फ्लॅटधारकांचे दररोज पार्किंगवरून वाद होत आहेत.
यावर उपाय म्हणून येत्या काळात उभारण्यात येणाऱ्या अपार्टमेंटमध्ये बहुमजली पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. आर्किटेक्टकडून तसे प्रकल्पाचे डिझाईन बनवून घेतले जात आहे.
सध्या शहरात ज्या इमारती आहेत, त्यात तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच काही नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी दोन मजली कार पार्किंग तयार केली आहे, तर काही बोटांवर मोजण्यासारख्या अपार्टमेंटमध्ये ‘स्टॅक’ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात लिफ्टद्वारे कार वर पार्किंग केली जाते. कमी जागेत एकावर एक कार पार्किंगचा हा पर्याय लोकप्रिय होत आहे.
तसेच आलिशान अपार्टमेंटमध्ये ‘पझ्झनेब’ पार्किंगची सुविधा निर्माण करून दिली आहे. यात कार ऑटोमॅटिक तळमजल्यावर पार्किंगमध्ये जाते. यात टोकन नंबर दिला जातो, त्यानुसार कार पार्क होते व ते टोकन दाखविल्यावर पार्किंगमधून कार ॲटोमॅटिक बाहेर येते.
शहरातील आघाडीचे बांधकाम व्यावसायिक आता बहुमजली पार्किंग तयार करीत आहेत. आलिशान अपार्टमेंटमध्ये प्रत्येक मजल्यावरील फ्लॅटसमोर खास रॅम्प असणार आहे. तिथे कार पार्किंगची व्यवस्था करून देणार आहेत. तो फ्लॅट १० व्या किंवा १२ व्या मजल्यावर असला तरी तिथे कार पार्किंग असणार आहे. कारसाठी स्वतंत्र लिफ्ट असणार आहे. लिफ्टद्वारे कार वरच्या मजल्यापर्यंत नेण्यात येईल. येत्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत तुम्हाला अशी बहुमजली कार पार्किंग प्रत्यक्ष बघण्यास मिळेल.
चौकट
भाड्याने दिली जातेय पार्किंग
शहरात काही अपार्टमेंटमध्ये काही फ्लॅटधारकांनी एकापेक्षा जास्त कार पार्किंगची जागा विकत घेतली आहे. हे फ्लॅटधारक अन्य फ्लॅटधारकांना कार पार्किंगसाठी जागा भाड्याने देत आहेत. येत्या काळात फ्लॅटधारकांना पार्किंगसुद्धा उत्पन्नाचे साधन होऊ शकते.
चौकट
पार्किंगसाठी मोजावी लागेल जास्त रक्कम
मल्टी लेव्हल पार्किंगसाठी १ लाख स्क्वेअर फुटाची जागा असेल तर २५ हजार स्क्वेअर फूट जागा पार्किंगसाठी सोडावी लागते. यामुळे पार्किंग धरून सव्वा लाख स्क्वेअर फूट परिसर धरला जातो. मल्टी लेव्हल पार्किंगसाठी फ्लॅटधारकांना जास्तीची रक्कम मोजावी लागणार आहे. सध्या ६० लाखांचा जर फ्लॅट असेल, तर त्यास ३ लाख रुपये पार्किंगचे मोजावे लागतील. म्हणजे फ्लॅटच्या किमतीच्या ५ टक्के रक्कमही पार्किंगसाठी द्यावी लागेल.
नितीन बगडिया
अध्यक्ष, क्रेडाई