बहुमजली इमारती रडारवर
By Admin | Published: June 24, 2017 12:31 AM2017-06-24T00:31:58+5:302017-06-24T00:35:34+5:30
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरात सध्या सुरू असलेल्या अवैध बांधकामांविरुद्ध सिडको प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरात सध्या सुरू असलेल्या अवैध बांधकामांविरुद्ध सिडको प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेषत: महानगरातील अनधिकृत बहुमजली इमारती रडारवर असून, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मालमत्ताधारकांना बांधकाम काढून घेण्यासंदर्भात प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सिडको वाळूज महानगरात बहुमजली इमारती बांधण्यास प्रशासनाची कुठलीही परवानगी नसताना अनेक धनदांडग्यांनी अवैधरीत्या बांधकाम करून बहुमजली इमारती उभारल्या आहेत. विशेष बाब म्हणजे काही बड्या अतिक्रमणधारकांनी तर सिडकोच्या जागेतच अतिक्रमण करून इमारती, संरक्षक भिंती बांधल्या आहेत. या अतिक्रमणामुळे एलआयजी व एमआयजी भागातील अंतर्गत रस्ते अरुंद होत चालले असून, रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सिडकोचे स्थानिक अधिकारी व अतिक्रमणधारकांचे हितसंबंध असल्याने या अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप काही सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यास सिडकोचे अधिकारी सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी केवळ पाहणी करून तडजोडअंती निघून जातात. सिडको अधिकाऱ्यांच्या या धोरणामुळे एलआयजी व एमआयजी भागात केवळ पहिल्या मजल्यापर्यंत परवानगी असतानाही याठिकाणी तीन ते चार मजली इमारती बांधल्या आहेत. वाढत्या अनधिकृत बांधकामांची प्रशासनाने दखल घेऊन अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही स्थानिक अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करून अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत.