संस्थाचालकांच्या कमाईच्या अनेक वाटा; दहावीच्या परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी मागितले ३० हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 01:10 PM2022-03-15T13:10:19+5:302022-03-15T13:11:05+5:30

शिक्षण क्षेत्राला धक्का, या शाळेत तक्रारदार विद्यार्थी १७ नंबरचा फाॅर्म भरून दहावीच्या परीक्षेला बसला होता.

Multiple ways of the education societys earnings; 30,000 rs bribe for allowing copying in 10th exam | संस्थाचालकांच्या कमाईच्या अनेक वाटा; दहावीच्या परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी मागितले ३० हजार रुपये

संस्थाचालकांच्या कमाईच्या अनेक वाटा; दहावीच्या परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी मागितले ३० हजार रुपये

googlenewsNext

औरंगाबाद : शिक्षणतज्ज्ञ म्हणून मिरवत असलेला संस्थाचालक एस.पी. जवळकर याने दहावीच्या विद्यार्थ्यास हॉलतिकिट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी ३० हजार रुपये मागितले. पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. त्यावरून लावलेल्या सापळ्यात जवळकर हा १० हजार रुपयांची लाच घेताना शाळेतच रंगेहाथ पकडला गेला.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कलावतीदेवी चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष संपत पाराजी (एसपी) जवळकर (वय ६४) याची सातारा परिसरात पी.डी. जवळकर ही शाळा आहे. या शाळेत तक्रारदार विद्यार्थी १७ नंबरचा फाॅर्म भरून दहावीच्या परीक्षेला बसला होता. या विद्यार्थ्यास शाळेतील लिपिक सविता खामगावकर (५२) हिने हॉलतिकिटासह दहावीच्या परीक्षेत मदत करण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र विद्यार्थ्याने पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पी.डी. जवळकर शाळेत सापळा लावला. 

ठरलेल्या १५ हजारांपैकी १० हजारांचा पहिला हप्ता घेताना जवळकर यास पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच वेळी सविता खामगावकरला ही ताब्यात घेतले. यानंतर दोघांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक दीपाली निकम-भामरे, निरीक्षक रेश्मा सौदागर, सुनील पाटील, बाळासाहेब राठोड, सी.एन. बागूल, भीमराज जीवडे, अशोक नागरगोजे, विलास चव्हाण, विनोद आघाव यांच्या पथकाने केली.


संस्थाचालकांच्या कमाईच्या अनेक वाटा
शिक्षण संस्थाचालक शिक्षक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी लाखो रुपये घेतात. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचेही कंत्राट घेऊन पैसे कमावतात. प्राध्यापक, शिक्षकांची पदोन्नती, बदलीमध्ये पैसे मागतात. बोगस विद्यार्थी दाखवून अनुदान लाटतात. शाळा, महाविद्यालयाच्या विकासाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून शुल्क उकळतात. ते पैसे विकासावर खर्च न करता खिशात घालतात. मात्र एस. पी. जवळकरने चक्क १७ नंबर फाॅर्म भरलेल्या विद्यार्थ्याचे हॉल तिकीट देण्यासाठीच पैसे घेतल्याचे समोर आले. वेगवेगळ्या मार्गातून मिळणारे पैसे कमी पडल्यामुळे चक्क हॉल तिकिटासाठीही विद्यार्थ्यांची गळचेपी करण्यात येत असल्याचेही यातून स्पष्ट झाले.

Web Title: Multiple ways of the education societys earnings; 30,000 rs bribe for allowing copying in 10th exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.