वडगावच्या पाझर तलावातून खुलेआम मुरुम चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:18 PM2019-03-26T23:18:25+5:302019-03-26T23:18:33+5:30
वडगाव कोल्हाटी पाझर तलावातून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन खुलेआमपणे वाहनातून मुरुमाची चोरी केली जात आहे.
वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी पाझर तलावातून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन खुलेआमपणे वाहनातून मुरुमाची चोरी केली जात आहे. या मुरुमचोरीसाठी केल्या जाणाऱ्या उत्खननामुळे तलाव पात्रात मोठ मोठाले खड्डे पडले असून तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. मुरुमचोरीकडे महसूल व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करित असल्याने सुज्ञ नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
वडगाव कोल्हाटीसह परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असल्याने मुरुमाला चांगली मागणी आहे. कमी वेळेत चांगला नफा मिळत असल्याने अनेकांनी विशेषत राजकीय पुढाऱ्यांनी मुरुम विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. या मुरुम माफियाकडून परिसरातील मोकळ्या भूखंडावर चोरी-छुपे उत्खनन करुन मुरुम चोरी केली जात आहे. वडगावच्या पाझर तलावातून तर खुलेआमपणे जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन ट्रॅक्टर, हायवा आदी वाहनातून बिंदास्तपणे मुरुमाची वाहतूक केली जात आहे. गेल्या अनेक दिवसापासून हा प्रकार सुरु असल्याने तलावाच्या पात्रात अनेक ठिकाणी मोठ मोठाले डोक्या एवढाले खड्डे पडले आहेत.
तलावातील खड्यात बुडून अनेकांचा मृत्यु झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मुरुमचोरीसाठी दररोज होत असलेल्या उत्खननामुळे तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले असून भविष्यात मोठा पाऊस झाला तर तलाव फुटून गावात पाणी शिरण्याची भिती निर्माण झाली आहे. मुरुम माफिया गुंड प्रवृत्तीचे असल्याने व राजकीय वरदहस्त असल्याने या मुरुमचोरीकडे महसूल व स्थानिक ग्रामपंचातय प्रशासन सोईस्करपणे डोळेझाक करित आहे. प्रशासनाच्या या बघ्याच्या भूमिकेमुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. एकीकडे महसूल विभागाने चोरट्या वाळू वाहतूकीवर कारवाई करुन वाळू माफियावर चांगलाच जरब बसविला आहे. तर दुसरीकडे मात्र मुरुम माफियाला मोकळे रान सोडले आहे. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे सुज्ञ नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.