ढोल-ताशांची मुंबई संस्कृती लातूर शहरातही रुजतेय !
By Admin | Published: August 25, 2016 12:46 AM2016-08-25T00:46:07+5:302016-08-25T01:01:35+5:30
राजकुमार जोंधळे , लातूर पुण्या-मुंबईत प्रसिध्द असलेल्या ढोल-ताशांच्या संस्कृतीला लातुरातही आता पोषक वातावरण मिळत असल्यामुळे ही संस्कृती लातुरातही रुजू लागली आहे.
राजकुमार जोंधळे , लातूर
पुण्या-मुंबईत प्रसिध्द असलेल्या ढोल-ताशांच्या संस्कृतीला लातुरातही आता पोषक वातावरण मिळत असल्यामुळे ही संस्कृती लातुरातही रुजू लागली आहे. परिणामी, शहरात विविध ठिकाणी गणेश मंडळांकडून गणरायाच्या स्वागतासाठी झांज आणि ढोल-ताशा पथकांकडून गत दोन महिन्यांपासून रंगीत तालीम सुरु आहे.
गावभागातील मंडळांकडून सर्वप्रथम ढोल-ताशांची संकल्पना राबविण्यात आली. या ढोल-ताशा आणि झांज पथकाला आता २० वर्ष होत आहेत. डॉल्बीच्या जमान्यात ढोल-ताशांच्या संस्कृतीची जपणूक शहरातील ३० गणेश मंडळांकडून केली जात आहे. पुण्या-मुंबईत रुजलेल्या ढोल-ताशांच्या संस्कृतीविषयी गावाकडच्या माणसांमध्ये अप्रूप होते. शेवटी, पुण्या-मुंबईच्या धर्तीवर लातुरातही ढोल-ताशांच्या पथकांची संकल्पना ‘धाडस’ कला पथकाच्या युवकांनी साकारली आहे. यासाठी त्यांनी प्रारंभी वर्गणीतून पाच ढोलची खरेदी केली आहे.
डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आता विविध गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे. डॉल्बीला पर्याय म्हणून पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्याचा संकल्प या गणेश मंडळांनी केला आहे. शहरात सध्या विविध गणेश मंडळांकडून डॉल्बीपेक्षा ढोल-ताशाला अधिक महत्व दिले जात आहे. या संस्कृतीमुळे ढोल-ताशाला गतवैभव मिळाले आहे.
गणेशोत्सव अवघ्या १० दिवसांवर येवून ठेपला असून, गणरायाच्या जंगी स्वागतासाठी शहरातील विविध गणेश मंडळांकडून गेल्या दोन महिन्यांपासून ढोल, ताशा, झांज पथकांकडून रंगीत तालीम सुरु आहे. दररोज सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास शहरातील गावभाग, मित्रनगर, बप्पा गणेश मंडळ भुसार लाईन, औसा हनुमान, शाम नगर, प्रकाश नगर, खाडगाव रोड परिसर, औसा रोड, आदर्श कॉलनी, जुना औसा रोड, शाहू चौक, कापड लाईन, साळे गल्ली, हत्तेनगर, सिध्देश्वर वेस आदी ठिकाणी या गणेश मंडळांकडून जय्यत तयारी सुरु आहे.
लातूर शहरात मोठ्या प्रमाणावर ढोल-ताशांचे पथक निर्माण व्हावेत, यासाठी आनंद पांचाळ, उमेश धर्माधिकारी, गणेश मोहिते, महेश धर्माधिकारी, समीर शेख, स्रेहा कोळी, दीपिका मंत्री, श्रेया कवठाळे, दीपक जाधव, किशोर गिरी, नागेश सिंगनाथ, बालाजी पाटील, विकी पाटील यांनी आता पुढाकार घेतला आहे.