मुंबई, पुण्याच्या खवय्यांना लागली गदानातील बचत गटाच्या कारल्याच्या लोणच्याची गोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 07:31 PM2022-03-08T19:31:53+5:302022-03-08T19:32:37+5:30
Women's Day Special गदाना येथील वैशाली प्रशांत गदानकर आणि अनिता बबन खाडे यांच्यासह अन्य आठ महिलांनी एकत्र येऊन डिसेंबर २०१९ मध्ये स्वयंसाहाय्यता बचत गटाची स्थापना केली.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या म्हणीचा वापर करून गदाना (ता. खुलताबाद) येथील महिलांनी गुरुदत्त महिला स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून सुरू केलेल्या लिंबू आणि कारल्याच्या लोणच्याने त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. या लोणच्याची चव मुंबई, पुणेकरांना भावल्याने चांगली ऑर्डर मिळत असल्याने या महिलांच्या जीवनात लोणच्याने गोडी निर्माण केली आहे.
गदाना येथील वैशाली प्रशांत गदानकर आणि अनिता बबन खाडे यांच्यासह अन्य आठ महिलांनी एकत्र येऊन डिसेंबर २०१९ मध्ये स्वयंसाहाय्यता बचत गटाची स्थापना केली. बचत गटातील महिलांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत व्हावी यासाठी बचत गटातील महिला दरमहा १०० रुपये बचत करू लागल्या. स्थापनेनंतर अवघ्या तीन-चार महिन्यांत कोरोना महामारीची साथ आली. मात्र, या काळात या महिलांनी न डगमगता कारले आणि लिंबाचे लोणचे तयार करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी या बचत गटाच्या अध्यक्षा वैशाली गदानकर आणि सचिव अनिता खाडे यांचा उद्योगशीलतेचा स्वभाव पाहून त्यांना प्रोत्साहित केले. त्यांना मार्गदर्शन करीत बचत गटाला भारतीय स्टेट बँकेकडून एक लाख रुपये कर्ज मिळवून दिल्याने बचत गटाच्या हातात खेळते भांडवल उपलब्ध झाल्याने सुरुवातीला काही दिवस अवघे ४० ते ५० किलो लोणचे तयार करून विक्री करीत असत.
पुण्यातील दीदी फार्म या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या गावाला भेट दिली, तेव्हा त्यांना लोणच्याची चव चाखायला दिली. ती आवडल्याने त्यांनी लोणचे तयार करण्याची पद्धत पाहिली. ही पद्धतही आवडल्याने त्यांनी पहिली ऑर्डर दिली. याचवेळी त्यांनी या व्यवसायासाठी लागणारे लायसन्स आणि प्रयोगशाळेकडून तपासणी प्रमाणपत्रही मिळविण्यासाठी सहकार्य केले. पुणे आणि मुंबईत स्टॉल लावून येथील लोणच्याची विक्री करतात. पुणे, मुंबईकरांना या बचत गटांच्या लोणच्याची गोडी लागल्याने तीन महिन्यांत त्यांना तीन क्विंटल लोणच्याची ऑर्डर मिळाल्याचे गदानकर यांनी सांगितले.
सहा महिन्यांत ६ लाखांची उलाढाल
शून्यातून सुरुवात करणाऱ्या या बचत गटाने सहा महिन्यांत सहा लाख रुपयांची उलाढाल केल्याची माहिती शासनाच्या उमेद प्रकल्प प्रमुख सुनील बर्वे यांनी दिली. ते म्हणाले की, या महिलांनी मेहनतीतून त्यांचा व्यवसाय उभारला आहे. आता त्यांना रोजगार मिळाल्याने पैसेही मिळत आहेत.