रेल्वेने जिवाची मुंबई एका दिवसात नाहीच; प्रवाशांची दैना थांबवा, 'जनशताब्दी' जुन्या वेळेत सोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 02:29 PM2022-09-06T14:29:44+5:302022-09-06T14:30:42+5:30
Janshatabdi Express from Aurangabad: बदललेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना भुर्दंड, मुक्कामच करावा लागतो
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जनशताब्दी एक्स्प्रेसने पूर्वी मुंबईला गेल्यानंतर त्याच दिवशी इतर रेल्वेनेऔरंगाबादला परत येणे शक्य होत असे. कारण ही रेल्वे सकाळी ६ वाजता सुटून १ वाजेपर्यंत मुंबईत पोहोचत असे; मात्र कोरोना विळख्यात अचानक जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली. त्यामुळे ही रेल्वे आता मुंबईला पोहोचेपर्यंत सायंकाळ होते. त्यामुळे मुंबईला मुक्काम करण्याची वेळ प्रवाशांवर ओढवत आहे. एका दिवसात जिवाची मुंबई करताच येत नसल्याची परिस्थिती आहे. (Janshatabdi Express from Aurangabad )
जनशताब्दी एक्स्प्रेस पूर्वी सकाळी ६ वाजता औरंगाबादहून सुटत असे. दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईत ही रेल्वे पोहोचत असे. त्यामुळे मुंबईतील कामे आटोपून नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसने त्याच दिवशी परतीचा प्रवास प्रवाशांना करता येत असे; परंतु आता जनशताब्दी एक्स्प्रेसने मुंबईत गेल्यानंतर मुक्काम केल्याशिवाय पर्याय उरत नाही. कारण ही रेल्वे आता औरंगाबादहून ९.२० वाजता सुटते आणि दुपारी ४.२० वाजता मुंबईत पोहोचते. याचा व्यावसायिक, व्यापाऱ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे.
९० टक्के प्रवासी बसतात औरंगाबादेतूून
जनशताब्दी एक्स्प्रेसने जालन्याहून जवळपास १० टक्के प्रवासी बसतात. या रेल्वेने प्रवास करणारे ९० टक्के प्रवासी औरंगाबादहून बसतात. त्यामुळे जालन्याहून येताना ही रेल्वे ९० टक्के रिकामी असते, ही रेल्वे जालन्याला नेऊन काय फायदा झाला, असे रेल्वे संघटनांचे म्हणणे आहे.
पूर्वीच्या वेळेनुसार सोडा
जनशताब्दी एक्स्प्रेस ही सध्या दुपारी ४.२० वाजता मुंबईला पोहोचते. या वेळेत गेल्यानंतर कोणतेही काम करता येत नाही. मुक्कामच करावा लागतो. पूर्वी एका दिवसात मुंबईला ये-जा करता येत होते. त्यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ पूर्वीसारखी केली पाहिजे.
- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती
प्रवाशांची दैना थांबवा
जनशताब्दी एक्स्प्रेस जालना येथे नेल्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला होत आहे. मुंबईला वेळेत पोहोचण्यासाठी धडपड लोकांना करावी लागत आहे. वेळेचे नियोजन चुकत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेतून जनशताब्दी एक्स्प्रेस जुन्या वेळापत्रकानुसार सोडून प्रवाशांची दैना थांबवावी.
- विकीराजे पाटील, मराठवाडा रेल्वे विकास मंच