मुंबईतील विद्यार्थी करिअरचे; औरंगाबादचा पदवीचे बोलतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 07:54 PM2019-06-27T19:54:06+5:302019-06-27T19:55:46+5:30
मुंबई आणि औरंगाबादेतील विद्यार्थ्यांच्या विचारसरणीमध्ये मूलभूत फरक असल्याचे जाणवले.
- राम शिनगारे
मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद येथील विद्यापीठांच्या कुलगुरूपदाचा कारभार पाहताना अनेक अनुभव आहेत. त्यात मुंबई आणि औरंगाबादेतील विद्यार्थ्यांच्या विचारसरणीमध्ये मूलभूत फरक असल्याचे जाणवले. मुंबईतील विद्यार्थी करिअरचे बोलतो. औरंगाबादेतील विद्यार्थी पदवीबद्दल बोलत असतो. हा विचारातील फरक बदलावा लागेल, असे मत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.
चार विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविले आहे. या सर्व ठिकाणी आपणाला काय वेगळेपण जाणवले?
मुंबई विद्यापीठाला दीर्घ परंपरा आहे. त्याठिकाणी शिक्षणाचा मोठा वारसा आहे. जागतिक दर्जाचे शहर आहे. कोल्हापूरला शाहू महाराजांच्या राजवटीचा परिणाम अद्यापही जाणवतो. त्याठिकाणी शिक्षणाची एक परंपरा निर्माण झालेली आहे. त्याठिकाणी विद्यापीठांमध्ये कोणत्याही राजकीय पक्ष, संघटनांचा हस्तक्षेप नसतो. पुण्यातही विद्वत्तेची मोठी परंपरा आहे. महात्मा फुले यांचा वारसा आहे. मात्र औरंगाबादेतील निजाम राजवटीचा प्रभाव अद्यापही जाणवतो. यातून बाहेर यावे लागेल.
जॉब रेडी युवक कसे तयार होतील?
काहीच करता येत नाही म्हणून दुसरे शिक्षण घेतल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या शिक्षणाला कौशल्याची जोड द्यावी लागेल. त्यातून उद्योगासह सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असलेले जॉब रेडी विद्यार्थी तयार करावे लागतील. त्यासाठी कौशल्य, संशोधन, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या चतु:सूत्रीवर अधिक भर द्यावा लागेल.
बदलत्या तंत्रज्ञानात विद्यापीठांना सुद्धा बदलावे लागेल. हा बदल कसा असावा?
तंत्रज्ञानातील बदलाचा वेग प्रचंड आहे. हा बदल टिपताना मूलभूत ज्ञानाला सोबतच घेऊन जावे लागते. मूलभूत ज्ञान आणि बदलत्या तंत्रज्ञानाची सांगड घालतानाच विवेक वापरावा लागेल. हा विवेक मिळण्याचे दोन ठिकाण आहेत. त्यातील पहिले ठिकाण हे घर असून, दुसरे ठिकाण ही शाळा आहे.
विद्यापीठाची प्रतिमा सुधारण्यासाठी काय करावे?
प्रत्येक व्यक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे आपले विद्यापीठ वाटले पाहिजे. त्यासाठी विद्यापीठालाही पुढे यावे लागेल. जनतेशी संवाद साधत नाळ जोडावी लागेल. त्याशिवाय होणार नाही. हे सगळे करण्यासाठी प्रशासनातील सुसंवाद महत्त्वाचा आहे. हा संवाद साधताना विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी आणि प्राध्यापक यातील प्रत्येकाच्या मताला मान-सन्मान कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे लागेल. त्याशिवाय आपलेपणाची भावना निर्माण होणार नाही.
समाज एकाएकी बदलत नाही. त्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गुलामीच्या मानसिकतेमुळे विषमता निर्माण होते. पाश्चात्त्य शिक्षण पद्धतीने ही गुलामीची पद्धती निर्माण केली. त्यामुळे स्वत:च्या विचाराने काम करावे लागेल. शाळा आणि घर या दोन्ही ठिकाणीच विवेकपूर्ण संस्कार होऊ शकतात.त्यासाठी ही ठिकाणे सक्षम असतील तर विद्यार्थी चांगले घडतील.