मुंबईचा रेल्वे प्रवास वेगवान होईल; ताशी १३० कि.मी. वेगाला मंजुरी,अंमलबजावणीत मात्र अडचणी
By संतोष हिरेमठ | Published: August 2, 2023 01:50 PM2023-08-02T13:50:36+5:302023-08-02T13:51:18+5:30
‘हाय स्पीड’साठी प्रवाशांना आणखी काही महिने वाट पाहावी लागेल.
छत्रपती संभाजीनगर : जालना ते मनमाड या १७४ किलोमीटरच्या मार्गावर रेल्वेगाड्यांची गती ताशी १३० किलोमीटरपर्यंत वाढविण्यास मार्चमध्ये मंजुरी मिळाली. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेंचा वेग वाढून प्रवाशांचा वेळ वाचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, चार महिन्यांनंतरही हा वेग फक्त कागदावरच आहे. त्यामुळे मुंबईचा प्रवास वेगवान होण्यासाठी प्रवाशांना थोडी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
देशातील ५३ रेल्वे मार्गांवर ताशी १३० किलोमीटर वेगाने रेल्वे चालविण्यास मार्च महिन्याच्या प्रारंभी मंजुरी देण्यात आली. या ५३ मार्गांमध्ये जालना-मनमाड या मार्गाचा समावेश आहे. सध्या या मार्गावर ताशी १०० किलोमीटर वेगाने रेल्वे धावतात. हा वेग लवकरच १३० कि.मी. पर्यंत वाढेल, असे सांगितले जात होते. परंतु या मार्गावरील रेल्वे प्रवास ‘स्लो ट्रॅक’वरच आहे. ‘हाय स्पीड’साठी प्रवाशांना आणखी काही महिने वाट पाहावी लागेल.
वेग वाढीत कोणत्या अडचणी?
दक्षिण मध्य रेल्वेकडून गेल्या काही महिन्यांत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासह रुळ, पाॅइंट्स आदींच्या मजबुतीकरणावर भर देण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये रेल्वे रुळ बदलण्यात आले. रेल्वे रुळावर अचानक पाळीव जनावरे येण्याची समस्या मोठी आहे. ठिकठिकाणी रेल्वेगेटही आहेत. रेल्वेचा वेग वाढीत या गोष्टी अडचणीच्या ठरतात. त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वेग वाढल्यानंतर किती वेळ वाचणार?
सध्या डिझेल इंजिनद्वारे ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने रेल्वे धावतात. आजघडीला छत्रपती संभाजीनगर ते मुंबई रेल्वे प्रवासासाठी ७ ते ७.४५ तास लागतात. परंतु रेल्वेचा वेग प्रतितास १३० किलोमीटरपर्यंत वाढल्यानंतर मुंबईच्या प्रवासात वेळेचीही बचत होणार आहे. किमान एक ते दीड तास वाचू शकतो, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
‘डीआरएम’ म्हणाल्या...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार म्हणाल्या, १३० कि.मी. वेगाने रेल्वे धावण्यासाठी ‘सेफ्टी फिनिशिंग’ करावी लागेल. हे ग्रेडेड काम आहे. कामाला वेळ द्यावा लागेल. एकदम १३० कि.मी.चा वेग होणार नाही. मात्र, लवकरच या वेगाने रेल्वे धावेल.