अंत्यविधीची तयारी सुरू असताना मयताची हालचाल; पाणीही पिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:24 AM2018-04-07T00:24:06+5:302018-04-07T00:26:15+5:30
अंत्यविधीची सगळी तयारी झालेली. पार्थिवाला अंघोळ घालणार तोच मयताच्या शरीराची हालचाल झाल्याचे काहींना जाणवले. त्यामुळे जिवंत असल्याच्या शक्यतेने ग्लासने पाणी पाजण्यात आले. तोपर्यंत आलेल्या एका डॉक्टराने सदर व्यक्ती अजूनही जिवंत असल्याचे सांगताच शेकडो नातेवाईक पार्थिव घेऊन घाटीत पोहोचले. सदर व्यक्ती जिवंत असताना घाटीतील डॉक्टरांनी शुक्रवारी सकाळी मयत घोषित केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अंत्यविधीची सगळी तयारी झालेली. पार्थिवाला अंघोळ घालणार तोच मयताच्या शरीराची हालचाल झाल्याचे काहींना जाणवले. त्यामुळे जिवंत असल्याच्या शक्यतेने ग्लासने पाणी पाजण्यात आले. तोपर्यंत आलेल्या एका डॉक्टराने सदर व्यक्ती अजूनही जिवंत असल्याचे सांगताच शेकडो नातेवाईक पार्थिव घेऊन घाटीत पोहोचले. सदर व्यक्ती जिवंत असताना घाटीतील डॉक्टरांनी शुक्रवारी सकाळी मयत घोषित केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. तेव्हा इसम मृत असल्याचे घाटीने पुन्हा घोषित केले.
अप्पासाहेब जगन्नाथ दाभाडे (४५, रा. जयभीमनगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. दाभाडे यांना लिव्हर फेल्युअर, सादूपिंडला सूज आदींमुळे उपचारासाठी २९ मार्च रोजी घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना ५ एप्रिल रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना ट्रामा विभागात दाखल केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे ४.१५ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सकाळी ७ वाजेच्या सुमारास नातेवाईक मृतदेह घेऊन घरी गेले. अंत्यविधीची तयारी करण्यात आली. ठिकठिकाणचे नातेवाईक दाखल झाले. पार्थिवाला अंघोळ घालणार तोच त्यांची हालचाल सुरू आहे, नाडी सुरू असल्याचे काहींनी म्हटले आणि एकच धावाधाव सुरू झाली. नजीकच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. या डॉक्टरांनी मृत व्यक्ती जिवंत असल्याचे सांगताच नातेवाईकांनी मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरांविषयी संताप व्यक्त करीत दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुन्हा घाटी गाठली. अपघात विभागासमोर मोठ्या संख्येने नातेवाईक गोळा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी नातेवाईकांना शांत करीत सदर व्यक्तीची पुन्हा तपासणी करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांना पाचारण केले. तोपर्यंत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक राजश्री आडे हेदेखील घाटीत पोहोचले. अनेस्थेशिया, सर्जरी, मेडिसिन विभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी वारंवार तपासणी करून खात्री केली. तेव्हा सदर व्यक्ती मृत असल्याचेच डॉक्टरांनी घोषित केले. यावेळी उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक, डॉ. आनंद बीडकर, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. सरोजनी जाधव, डॉ. चंद्रकांत थोरात आदी वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते.
...तर गुन्हा दाखल होईल
याप्रकरणी नातेवाईकांची तक्रार आल्यावर डॉक्टरांवर थेट गुन्हा दाखल करता येणार नाही. प्रारंभी ही तक्रार अधिष्ठातांना देण्यात येईल. त्यांच्याकडून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल. चौकशीमध्ये काही निष्काळजीपणा झाल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल.
-गोवर्धन कोळेकर, सहायक पोलीस आयुक्त