मुंडे यांनी केणेकरांना दिली ‘राष्ट्रवादी’ची आॅफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:45 AM2018-01-31T00:45:40+5:302018-01-31T00:46:09+5:30
विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांना राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात येण्याची आॅफर दिली आहे. मुंडे हे भाजपमध्ये असताना त्यांनी व केणेकर यांनी सोबतच युवा मोर्चामध्ये काम केले. त्या जुन्या आठवणींना काल सोमवारी विभागीय आयुक्तालय परिसरात धावता उजाळा मिळाला. यावेळी आ.विक्रम काळे, माजी नगरसेवक अभिजित देशमुख आदींची उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांना राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात येण्याची आॅफर दिली आहे. मुंडे हे भाजपमध्ये असताना त्यांनी व केणेकर यांनी सोबतच युवा मोर्चामध्ये काम केले. त्या जुन्या आठवणींना काल सोमवारी विभागीय आयुक्तालय परिसरात धावता उजाळा मिळाला. यावेळी आ.विक्रम काळे, माजी नगरसेवक अभिजित देशमुख आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हल्लाबोल आंदोलन ३ फेबु्रवारी रोजी होणार असून, त्यासाठी आयुक्तालय परिसरात सभेसाठी जागा निश्चितीच्या हेतूने मुंडे यांनी पाहणी केली. त्या दरम्यान केणेकर हे आयुक्तालयात एका शिष्टमंडळासोबत निवेदन देण्यासाठी आले होते. केणेकर बाहेर पडण्यास आणि मुंडे येण्यास एकच योग आला. तो भेटीचा योग क्षणाचा असला तरी त्यात झालेल्या चर्चेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियामध्ये त्यांच्या भेटीचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. धनंजय मुंडे जेव्हा भाजपमध्ये होते त्यावेळी ते युवामोर्चाचे अध्यक्ष होते, तर संजय केणेकर हे सचिव होते. उभयतांमध्ये राजकीय चर्चा तर झालीच, शिवाय एकमेकांना खोपरखळ्यादेखील त्यांनी मारल्या. भाजप सत्तेत असल्यामुळे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अच्छे दिन असल्याचा टोला मुंडे यांनी केणेकर यांना लगावला. भाजपमध्ये अच्छे दिन नसतील, तर येऊन जा राष्ट्रवादीमध्ये भाजपने तर काही आमदार केले नाही, आमच्याकडे संधी आहे, अशी थेट आॅफरच मुंडे यांनी केणेकर यांना
त्या भेटीतील गप्पागप्पांत देऊन टाकली.
ते मित्रत्वाच्या नात्याने बोलले
भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष केणेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, विरोधी पक्षनेते मुंडे यांनी राष्ट्रवादीत येण्याची आॅफर ही मित्रत्वाच्या नात्याने दिली. त्यांनी त्या भावनेने पक्षात येण्यासाठी आमंत्रित केले. ते भाजपमध्ये असताना आम्ही सोबतच काम केले होते.
असंतुष्टांसाठी व्यूहरचना
शिवसेना-भाजपमध्ये जुने पदाधिकारी, कार्यकर्ते सत्ता आल्यापासून असंतुष्ट आहेत. त्यामुळे असंतुष्टांना राष्ट्रवादीत घेण्याबाबत व्यूहरचना आखली जात आहे. सेना-भाजपमधील दु:खी प्यादे गळाला लागल्यास त्याचा पक्षाला फायदा होईल, असे राष्ट्रवादीला वाटत असून, त्या हेतूनेच फोडाफोडी करण्याचे प्रयत्न आगामी काळात होणे शक्य आहे.