मुंडे यांच्या अस्थी विसर्जित

By Admin | Published: June 13, 2014 01:05 AM2014-06-13T01:05:45+5:302014-06-13T01:12:08+5:30

औरंगाबाद : वेदमंत्रोच्चारात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा दशक्रिया, पिंडदान विधी मोक्षतीर्थ असलेल्या पैठणच्या गोदातीरावरील कृष्णकमल तीर्थ घाटावर गुरुवारी शांततेत पार पडला.

Munde's bone dissolved | मुंडे यांच्या अस्थी विसर्जित

मुंडे यांच्या अस्थी विसर्जित

googlenewsNext

औरंगाबाद : ‘अमर रहे-अमर रहे, गोपीनाथ मुंडे अमर रहे’, ‘परत या - परत या, साहेब तुम्ही परत या’च्या गगनभेदी घोषणा आणि वेदमंत्रोच्चारात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा दशक्रिया, पिंडदान विधी मोक्षतीर्थ असलेल्या पैठणच्या गोदातीरावरील कृष्णकमल तीर्थ घाटावर गुरुवारी शांततेत पार पडला. आ. पंकजा, प्रीतम व यशश्री या तिन्ही कन्यांनी आपल्या वडिलांच्या अस्थी गोदावरीत विसर्जित केल्या व मुंडे यांच्या या अनाहूत ‘गोदा परिक्रमा’ने उपस्थित हजारो चाहत्यांना दु:खसागरात लोटले. मुंडे यांचे आप्तस्वकीय, राजकारणातील मान्यवरांसह राज्यभरातून आलेले त्यांंचे हजारो चाहते यावेळी उपस्थित होते.
शांतिब्रह्म एकनाथ महाराज मंदिरामागील कृष्णकमल घाटावर सकाळी ९ वाजता दशक्रिया विधीस प्रारंभ झाला. प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, कन्या पंकजा, प्रीतम व यशश्रीसह प्रकाश महाजन व बहीण सरस्वती कराड आदी या विधीला बसले होते. भगवानगडाचे नामदेव शास्त्री, महासांगवी संस्थानच्या ह. भ. प. राधाताई सानप यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पैठण येथील वे.शा.सं.क्षेत्र उपाध्ये अनंत खरे व त्यांच्या सहकारी ब्रह्मवृंदांनी दशक्रिया विधी पार पाडला. त्यात पिंडदान, मंत्राग्नीसह गोपीनाथ मुंडे यांचा अपघातात मृत्यू झाल्याने नारायणनागबळी पूजा करण्यात आली.
पूजेला लागूनच उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. त्यासमोर अस्थिकलश ठेवण्यात आला.
सकाळी साडेदहा वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत जनतेने त्यांच्या लाडक्या नेत्याच्या अस्थींचे मनोभावे दर्शन घेत, आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
या व्यासपीठाला लागून मुंडे कुटुंबियांना बसण्यासाठी व्यासपीठ उभारले होते. पंडितअण्णा मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे सर्व कुटुंबीय तेथे बसून सर्व विधी पाहत होते.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खा. पूनम महाजन, राहुल महाजन, भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, महादेव जानकर, विनायक मेटे, आशिष शेलार, डॉ. राजेंद्र फडके, भाऊसाहेब फुंडकर, राम शिंदे, आ. माधुरी मिसाळ, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, शिरीष बोराळकर, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, ज्ञानोबा मुंढे, संदीपान भुमरे, आ. संतोष सांबरे, आ. गिरीश महाजन, श्रीकांत जोशी, अतुल सावे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, विजया रहाटकर, रेखा कुलकर्णी आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दशक्रिया विधीसाठी नाथ मंदिर परिसरात १ लाख स्क्वेअर फुटाचा मंडप उभारण्यात आला होता.
दशक्रिया विधी सर्वसामान्य जनतेस पाहता यावा म्हणून मंडपात भव्य आकाराच्या एलईडी टीव्ही संचावरून प्रक्षेपण करण्यात आले.
परळी येथील अनुभव लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्यासह ७ पोलीस अधीक्षक, १२ उपविभागीय पोलीस अधिकारी, २५ पोलीस निरीक्षक, ७५ सहायक पोलीस निरीक्षक व फौजदार यांच्यासह १६०० पोलीस कर्मचारी आणि ४ एसआरपीचे प्लॅटून तैनात करण्यात आले होते.
पिंडाला कावळा शिवला
पंकजा पालवे-मुंडे यांनी पिंडदान केले. त्यांनी पिंड ठेवताच क्षणार्धात कावळा पिंडाला शिवला, हे पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
अनेकांचे मुंडन
आ. धनंजय मुंडेंसह अनेक कार्यकर्ते व तरुणांनी मुंडन केले होते. त्यात मुंडे यांच्या सुरक्षारक्षकांचादेखील समावेश होता.
अनेक नेत्यांचे अस्थी विसर्जन पैठणमध्येच
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख या नेत्यांच्या अस्थींचे विसर्जन याच घाटावर करण्यात आले. त्यात आज मुंडे या नावाची भर पडली. परळीचे वैजिनाथ व पैठणचे संत एकनाथ या दोहोंच्या मध्ये मी गोपीनाथ असे ते नेहमी म्हणायचे.
आरंभ आणि शेवट...
सन २००६ मध्ये ६ ते ११ आॅगस्ट दरम्यान गोदावरीस आलेल्या महापुराने मराठवाड्यातील जनतेचे अतोनात नुकसान झाले होते. जनतेचे अश्रू पुसून त्यांना दिलासा देण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी ३१ आॅगस्ट २००६ ते १७ सप्टेंबर २००६ या कालावधीत गोदापरिक्रमेचे आयोजन केले होते. या परिक्रमेची सुरुवात याच घाटावर पूजा करून मुंडे यांनी केली होती.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी गोदावरीचे शुद्ध जल भरलेला कलश त्यांना भेट दिला होता. तो दोन्ही हातांनी उंचावून मुंडेंनी कलशाचे दर्शन घेतले होते. दि. १२ रोजी याच घाटावर अशाच कलशात गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. या योगायोगास समजून घेणे भाजपाच्या कार्यकर्त्यांना जड जात होते.

Web Title: Munde's bone dissolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.