औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी मुंडन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:46 AM2018-07-26T00:46:37+5:302018-07-26T00:47:15+5:30
मराठा आरक्षणासाठी सहा दिवसांपासून क्रांतीचौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात गुरुवारी (दि.२५) मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी मुंडन केले. यावेळी मुख्यमंत्री, सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी सहा दिवसांपासून क्रांतीचौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात गुरुवारी (दि.२५) मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी मुंडन केले. यावेळी मुख्यमंत्री, सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेतील क्रांतीचौकात २२ जुलैपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी सकाळपासूनच समाजातील युवक, युवती, विविध संघटनांचे पदाधिकारी ठिय्या आंदोलनात सहभागी होत होते. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि मुख्यमंत्री, सरकार, लोकप्रतिनिधींच्या विरोधात दिवसभर घोषणाबाजी करण्यात येत होती. दुपारी तीन वाजेनंतर आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ मुंडन
के ले.
या आंदोलनात रमेश केरे पाटील, अप्पासाहेब कुडेकर, रवींद्र काळे, सुरेश वाकडे, विशाल डिडोरे, अंकित चव्हाण, सुनील कोटकर, अशोक मोरे, दत्तात्रय घारे, दत्ता भोकरे, अंकुश लोखंडे, खंडू पाटील, संदीप मेटे आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ठिय्या आंदोलन सुरूच राहणार
मराठा आरक्षणासाठी मुंबईसह परिसरात पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल्यामुळे बंद मागे घेण्यात आलेला आहे; मात्र राज्यभरात ठिकठिकाणी सुरू असलेले ठिय्या आंदोलन कायम सुरू असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी दिली. हे आंदोलन ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे घेण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधिज्ञांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा
क्रांतीचौकात सुरू असलेल्या या आंदोलनाला शहरातील बहुतांश विधिज्ञांनी पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनस्थळी दुपारी एक वाजता विधिज्ञांनी भेट देऊन पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्षांना मराठा समाजाचा घेराव
४शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा येथील सकळ मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना घेराव घालून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. त्यावेळी अर्जुन पवार, अशोक पवार, अर्जुन पवार, ज्ञानेश्वर पवार, श्याम पवार, मनोज घनवट, विक्रम पवार, सखाराम पवार, भरत पवार आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.