महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय विलगीकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:27 PM2020-06-25T16:27:02+5:302020-06-25T16:30:25+5:30
पांण्डेय यांच्या समवेत त्यांचे कुटुंबही पाच दिवसांसाठी विलगीकरण करुन घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
औरंगाबाद : पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या बंगल्यात काम करणारा एक कर्मचारी मंगळवारी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे पती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारपासून स्वत:ला पाच दिवस विलगीकरण करून घेतले. महापालिकेचे सर्व काम ते घरी बसूनच करणार आहेत.
बंगल्यात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची सोमवारी कोरोना चाचणी घेण्यात आली. स्वत: पाण्डेय यांनीही एमजीएम येथे लाळेचे नमुने दिले होते. मंगळवारी सर्वांचा अहवाल प्राप्त झाला. बंगल्यावरील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला विलगीकरण करून घेण्याचा निर्णय पाण्डेय यांनी घेतला. पांण्डेय यांच्या समवेत त्यांचे कुटुंबही पाच दिवसांसाठी विलगीकरण करुन घेणार असल्याची माहिती मिळाली.
यासंदर्भात पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. दरम्यान, मनपाच्या वेगवेगळ्या कक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने तपासणी करून घेण्याची विनंती करण्यात आली आहे.