महानगरपालिकेच्या हमला पथकाने दिले ७ प्रभागांत ५४० टँकर्स पाणी
By Admin | Published: February 17, 2016 12:17 AM2016-02-17T00:17:53+5:302016-02-17T00:35:54+5:30
लातूर : महापालिकेच्या हमला पथकाने मंगळवारी ७ प्रभागांत तब्बल ५४० टँकर्स पाणी वितरण केले आहे. सकाळी ८.३० वाजता सुरू झालेली टँकरच्या पाण्याची ही मोहीम दिवसभर अगदी जोमात होती.
लातूर : महापालिकेच्या हमला पथकाने मंगळवारी ७ प्रभागांत तब्बल ५४० टँकर्स पाणी वितरण केले आहे. सकाळी ८.३० वाजता सुरू झालेली टँकरच्या पाण्याची ही मोहीम दिवसभर अगदी जोमात होती. प्रत्येकी दोनशे लिटर्स प्रमाणे पाणी वितरण करण्यात आले असून, कोणाचीही तक्रार शिल्लक नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
महापालिकेने नळयोजनेद्वारे पाणी देण्याचे केलेले नियोजन रद्द करून सोमवारी हमला पथकाद्वारे टँकरने पाणी देण्याची अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार मंगळवारी प्रभाग क्र. १५, १६, १७, २८, २५, ४ व ३२ मध्ये तब्बल ७० टँकर्सच्या माध्यमातून सकाळपासून पाणी वितरण सुरू करण्यात आले. सहाय्यक आयुक्त प्रदीप ठेंगळ यांनी गांधी चौकात पहिले टँकर भरून संबंधित भागाकडे पाठवून दिले. त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी, बांधकाम अभियंता, स्वच्छता निरीक्षक यांच्यासह सर्वच विभागांतील कर्मचारी पाणी वितरणाच्या कामाला लागले. त्यामुळे मनपा कार्यालयात दिवसभर शुकशुकाट होता.
परिणामी, इतर कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. सध्या पाण्याचा विषय गंभीर असल्याने आहे त्या परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करून तहान भागविण्याचा प्रयत्न मनपाकडून केला जात आहे. खाडगाव रोड, सोना नगर, चौधरी नगर, विकास नगर, सम्राट चौक, जाफर नगर, रेणापूर नाका आदी परिसरात दिवसभर टँकरचे पाणी वाटप केले होते.
कर्मचारी तसेच नगरसेवकही पाणी वाटपाच्या कामात व्यस्त होते. रात्री ९ वाजेपर्यंतही पाणी वाटपाचे काम सुरुच होते. या भागात आता पाच दिवसांनंतर टँकर येणार आहे. त्यामुळे जेवढे पाणी मिळाले, तेवढ्यावर आता पाच दिवस काढावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)